सर्व सहा पदाधिकारी पदांसह व्यवस्थापन समितीच्या दहाही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी; न्यायालय-नियुक्त निरीक्षकाच्या देखरेखीखाली पार पडली निवडणूक
मुंबई, दि. २६ : मुंबई प्रेस क्लबच्या बहुचर्चित निवडणुकीत ‘सेव्ह द प्रेस क्लब अलायन्स’ने (SPCA) एकहाती विजय मिळवत सर्व सहा पदाधिकारी पदांसह व्यवस्थापन समितीच्या दहाही जागा जिंकल्या. २४ जुलै रोजी झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या निकालात हिंदुस्तान टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र पी. गांगण अध्यक्षपदी निवडून आले. एकूण ८६२ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. निवडणूक प्रक्रियेतील वादामुळे प्रकरण प्रथमच मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. न्यायालयाने फेटाळलेली सर्व नामनिर्देशने स्वीकारण्याचे आदेश देत, निवडणूक मुक्त व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती केली होती. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी परिवर्तनाच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे मानले जात आहे.

असे लागले निकाल
अध्यक्षपदाच्या लढतीत सुरेंद्र पी. गांगण यांनी ५८२ मते (६७.५ टक्के) मिळवत राजीव खांडेकर (२६० मते) यांचा ३२२ मतांच्या फरकाने पराभव केला. चेअरपर्सनपदी एस. बालकृष्णन यांनी ५१० मते घेत मयूरेश गणपत्ये (३२२ मते) यांच्यावर विजय मिळवला. उपाध्यक्षपदी धोंडीबा (पांडुरंग) म्हस्के यांनी ५३७ मते मिळवत आशीष एस. राजे (२९१ मते) यांचा पराभव केला.
सचिवपदी अनिल कुमार सिंह (५१३ मते) यांनी सौरभ पी. शर्मा (३१५ मते) यांच्यावर, तर संयुक्त सचिवपदी सुधाकर एस. कश्यप (५१७ मते) यांनी रुचा कानोलकर (३२४ मते) यांच्यावर विजय मिळवला. कोषाध्यक्षपदी ओमप्रकाश तिवारी यांनी ४८७ मते घेत शशांक परेड (३३५ मते) यांचा पराभव केला.
व्यवस्थापन समितीत दहाही जागांवर आघाडी
व्यवस्थापन समितीवर वैभव परब (५३०), स्वप्निल ए. शिंदे (५०२), पूनम डी. अपराज (४९४), मनीषा एम. रेगे (४९१), अनीता डी. शुक्ला (४७४), शाहिद ए. अन्सारी (४४९), आदित्य आर. दुबे (४२७), मधु ए. नैनन (३९६), के. जे. बेनीचन (३८७) आणि उमेश डी. गोस्वामी (३८०) हे दहाही उमेदवार ‘सेव्ह द प्रेस क्लब अलायन्स’चेच निवडून आले.
“हा विजय प्रत्येक सदस्याचा” — गांगण
विजयानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेंद्र पी. गांगण यांनी सदस्यांचे आभार मानले. “हा विजय केवळ आमचा नाही, तर बदलासाठी मतदान करणाऱ्या प्रत्येक सदस्याचा आहे. मुंबई प्रेस क्लबची प्रतिष्ठा, पारदर्शकता आणि लोकशाही मूल्ये पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा कौल आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
सन २००९ मध्ये गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून सुमारे २५० पत्रकारांना हक्काची घरे मिळवून देणाऱ्या या संस्थेत पारदर्शक कारभाराची परंपरा पुन्हा प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा सदस्यांकडून व्यक्त होत आहे.

