प्रा. डॉ. राम ताकवले यांना विनम्र अभिवादन — दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, मुक्त शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषी तंत्रज्ञानाचे अग्रदूत
शरद पवार यांची एक फेसबुक पोस्ट नजरेस पडली आणि पुन्हा एकदा मन हेलावून गेलं.
प्रा. डॉ. राम ताकवले आता आपल्यात नाहीत, याला तीन वर्षे उलटून गेली. पण काही माणसं मृत्यूनंतरही संपत नाहीत — ती विचारांमध्ये जगतात, संस्थांमध्ये जगतात, तंत्रज्ञानात जगतात आणि हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमध्ये जगतात. डॉ. ताकवले हे त्यापैकीच एक.
आजच्या ‘पोस्ट-ट्रुथ’च्या काळात, जिथे द्वेष, विकृत इतिहास आणि कृत्रिमरीत्या भडकवलेल्या भावना सार्वजनिक चर्चेवर वर्चस्व गाजवत आहेत, तिथे हरगुडसारख्या ग्रामीण मातीतून आलेला एक शिक्षणतज्ज्ञ आयुष्यभर ज्ञानाच्या लोकशाहीसाठी लढत राहिला — ही गोष्ट आज नव्याने सांगावी लागते, हीच खरी शोकांतिका आहे.

पुण्यातील एका विद्यार्थ्याची आठवण
मी पुण्यात कृषी महाविद्यालयात शिकत होतो, ते दिवस.
एका बाजूला कृषी शिक्षण, दुसऱ्या बाजूला फोटोग्राफी, व्याख्यानं, भटकंती आणि “Earn While Learn” करत स्वतःचा मार्ग शोधण्याचा काळ होता तो. शेती आणि माहिती-तंत्रज्ञान यांचा संबंध जोडणं म्हणजे त्या काळात जवळपास वेडेपणाच समजलं जायचं.
१९९६-९७ मध्ये मी DOS, Lotus 1-2-3 आणि फ्लॉपी डिस्कच्या जगात संगणक शिकत होतो. इंटरनेट डायल-अपवर होतं. सायबर कॅफेमध्ये तासाला दहा ते तीस रुपये देऊन इंटरनेट वापरण्याचा तो काळ. आजच्या पिढीला हे सांगितलं तर परीकथा वाटेल.
‘ॲग्री-टेक’ हा शब्दही रूढ नव्हता तेव्हा
याच काळात माझी ओळख संजय बोरकर आणि शिवराई टेक्नॉलॉजीशी झाली. आम्ही “परिवर्तन” या प्रकल्पावर काम करत होतो. कल्पना अशी होती की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात संगणक जोडलेलं केंद्र उभं राहील; शेतकरी तिथे येईल, आपली समस्या मांडेल आणि तज्ज्ञांच्या नेटवर्कमधून त्याला मार्गदर्शन मिळेल.
आज “AI for Agriculture” म्हणत जग परिषदांमध्ये भाषणं देतं.
पण वीस वर्षांपूर्वी आम्ही एका एकरासाठी किती बियाणं लागेल हे सांगणारं Seed Calculator बनवत होतो. पिकांवरील रोग आणि किडींची लक्षणं ओळखून उपाय सुचवणारं सॉफ्टवेअर तयार करत होतो. दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने औषधी वनस्पती, आंबा लागवड आणि शेती पद्धतींवर मल्टिमीडिया सीडी बनवत होतो.

त्या काळात “ॲग्री-टेक” हा शब्दसुद्धा लोकप्रिय नव्हता.
आणि या परिवर्तनवादी चळवळीच्या केंद्रस्थानी होते — डॉ. राम ताकवले.
शिक्षणाला समाजाशी जोडणारे अभियंता
ते फक्त कुलगुरू नव्हते. ते शिक्षणाला समाजाशी जोडणारे खऱ्या अर्थाने अभियंता होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू — पण या पदांपेक्षा त्यांचं स्वप्न कितीतरी मोठं होतं: “ज्ञान हे शहरांच्या भिंतींमध्ये बंदिस्त न राहता गावागावात पोहोचलं पाहिजे.”
त्यांनी शिक्षणाला वर्गखोल्यांच्या चौकटीतून बाहेर काढलं आणि ते एका जनचळवळीचं रूप दिलं.
‘डिजिटल लर्निंग’ हा शब्द फॅशनेबल होण्याआधीच डॉ. ताकवले यांनी ओळखलं होतं की तंत्रज्ञान हे केवळ उद्योगाचं साधन नाही, तर ते समाजपरिवर्तनाचं माध्यम आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) सारख्या संस्थांमधून त्यांनी डिजिटल शिक्षणाचा भक्कम पाया घातला. Commonwealth of Learning सारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमधून आफ्रिकेसारख्या विकसनशील देशांपर्यंत मुक्त शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — निवृत्तीनंतरही ते थांबले नाहीत. आज अनेक लोक पद मिळालं की थांबतात. ताकवले सरांनी प्रत्येक पदाचा उपयोग परिवर्तनासाठी केला.
सामाजिक बांधिलकीतून घडलेला विचारवंत
त्यांच्या विचारांत राष्ट्रसेवा दलाची सामाजिक बांधिलकी होती, समाजवादी विचारांचा मानवतावाद होता आणि विज्ञाननिष्ठ सर्वसमावेशक शिक्षणाची क्रांतिकारक दृष्टी होती. समाज हा द्वेषाने किंवा घोषणांनी नव्हे, तर ज्ञानाने, विवेकाने आणि शिक्षणाच्या समान संधीने घडतो — यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
आजूबाजूला प्रचार, विभाजनवादी आख्यायिका आणि भावनिक फेरफाराचं वातावरण असताना डॉ. ताकवले यांच्यासारख्यांची आठवण काढणं हा एक प्रकारचा प्रतिकारच आहे — आणि आशेचाही.
पुरंदर तालुक्यातील हरगुड गावातून निघालेला हा ज्ञानसूर्य आकाशाएवढं काम करून गेला.
मृत्यूने त्यांचा देह नेला असेल, पण त्यांनी पेटवलेली परिवर्तनाची मशाल अजून विझलेली नाही. आज शेती, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांच्या संगमावर उभं राहून काम करणाऱ्या प्रत्येक तरुणामध्ये ताकवले सरांचं स्वप्न जिवंत आहे.
ज्ञानाचा महामेरू, परिवर्तनाचा शिलेदार, शिक्षणाला समाजक्रांतीची दिशा देणारे प्राध्यापक डॉ. राम ताकवले यांना विनम्र अभिवादन.
— विजय गायकवाड
(लेखक हे ज्येष्ठ कृषी पत्रकार, कृषी परवाचे संस्थापक-संपादक आणि F2F कॉर्पोरेट कन्सल्टंट्स प्रा. लि.चे Director of Strategy & PR आहेत.)
डॉ. राम ताकवले : तिसरे पुण्यस्मरण (१३ मे)
विद्यार्थीकेंद्री शिक्षणाची नवक्षितिजे धुंडाळणारे कुलगुरू
— प्रशांत कोठडिया | १३ मे २०२६
📖 याच विषयावर ज्येष्ठ कृषी पत्रकार विजय गायकवाड यांचा लेखही वाचा — मराठी → ज्ञानसूर्याचा अस्त… पण परिवर्तनाची ज्योत अजून जिवंत आहे English → The Sun of Knowledge Has Set… But the Flame Still Burns
काही अद्वितीय माणसं आपल्या आयुष्यात यायला केवळ उच्चप्रतीचे योग असायला लागतात आणि नकळत आपले आयुष्य विविध अंगाने उजळून निघते. तेव्हाच्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. राम ताकवले यांच्या रूपाने एक अत्यंत प्रसन्न व उमदे व्यक्तिमत्त्व १९८० साली पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आले आणि २०२३ पर्यंत — म्हणजेच त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत — ताकवले सरांनी माझे भावविश्व व्यापले होते. त्यांच्यासमवेत घालवलेला प्रत्येक क्षण, त्यांच्याशी झालेल्या गप्पा आणि वेळोवेळी केलेला विचारविनिमय मला सर्वार्थाने समृद्ध करत गेला. १३ मे २०२३ रोजी रात्री सरांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे विद्यापीठातील ते दिवस
डॉ. ताकवले सर १९७८ ते १९८६ या काळात कुलगुरू होते. नेमक्या याच काळात — १९८० ते १९८२ — मी पुणे विद्यापीठात ‘तत्त्वज्ञान’ विषयात एम.ए. करण्यासाठी प्रवेश घेतला होता. ती दोन वर्षे माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची ठरली. त्यातील सर्वात मोलाची बाब म्हणजे डॉ. राम ताकवले सरांशी परिचय झाला, त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
१९८१ साली मी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचा जनरल सेक्रेटरी (जी.एस.) म्हणून निवडून आलो. त्या दोन वर्षांत आम्ही अनेक उपक्रम राबवले. सुरुवात रक्तदान शिबिराने केली. सकाळी ठीक ९ वाजता मा. कुलगुरूंची गाडी शिबिराच्या ठिकाणी आली — सरांनी स्वतः रक्तदान करून उद्घाटन केले. त्यामुळे आमचा उत्साह दुणावला.
त्यानंतर आम्ही श्री. शरद जोशी यांचे पुण्यातील पहिलेवहिले जाहीर व्याख्यान विद्यापीठात आयोजित केले. चाकण येथील कांदा आंदोलन यशस्वी केल्यानंतरचा तो काळ होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना, हरगुडे (ता. पुरंदर, जि. पुणे) सारख्या लहानशा गावी जन्मलेल्या ताकवले सरांनी शेतकऱ्यांच्या व्यथांवर नेमके बोट ठेवले. आम्ही केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात सर आवर्जून उपस्थित राहायचे.
विद्यार्थ्यांसाठी सदैव संवेदनशील
शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रीच असले पाहिजे — या स्वतःच्या भूमिकेनुसार सर सदैव सतर्क असायचे. एक उदाहरण सांगतो. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तेव्हा बॅ. जयकर ग्रंथालय रात्री आठ वाजताच बंद व्हायचे. आम्ही काही सहकाऱ्यांनी पत्रक काढले — “ग्रंथालय आजपासूनच रात्री अकरापर्यंत सुरू ठेवावे.” हे पत्रक दहा मिनिटांत कुलगुरूंच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतरच्या दहा मिनिटांतच सरांनी ग्रंथपालांना फोन करून आदेश दिले — आणि असंख्य विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली.
जी.एस. झाल्यानंतर आम्ही सरांना विनंती केली की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अधूनमधून वेळ द्यावा. सरांनी तत्काळ निर्णय घेत प्रत्येक बुधवारी दुपारी ४ ते ५ ही वेळ खास आमच्यासाठी राखून ठेवली. बाहेरगावी जावे लागल्यास कार्यालयातून निरोप देण्याची व्यवस्थाही केली. गीताराम गायकवाड, संभाजी जाधव, प्रकाश पगारिया, संजय देवडीकर, ज्योती गिरमे, अजेय लिमये आदी सहकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मी जवळपास वर्षभर दर बुधवारी सरांची भेट घ्यायचो. परिणामी विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न एकही आंदोलन न करता मार्गी लागले.
मुक्त विद्यापीठाचे स्वप्न
१९८५ मध्ये महाराष्ट्र शासनाने डॉ. ताकवले सरांची महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कक्षाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली. भारतातील आणि जगभरातील ‘ओपन युनिव्हर्सिटी’चा सांगोपांग अभ्यास करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठीतून शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाचे विधेयक तयार करण्याची जबाबदारी सरांवर होती. या कामात सरांना साहाय्यकाची गरज होती — सरांनी माझ्याकडे विचारणा केली आणि मी लगेच होकार दिला. हीच मुळी माझ्यासाठी बहुमानाची बाब होती!
मुंबईत मंत्रालयासमोरच्या ‘न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इमारती’च्या १८ व्या मजल्यावर आम्हाला कार्यालय मिळाले. दर सोमवारी सकाळी पुणे–मुंबई आणि शुक्रवारच्या संध्याकाळी मुंबई–पुणे असा डेक्कन क्वीनने प्रवास घडायचा. या प्रवासात आणि ऑफिस सुटल्यानंतर चर्चगेटजवळील ‘न्यू शेल्टर’ इमारतीतील सरांच्या घरी चहा घेत तासनतास मारलेल्या गप्पा — हा माझ्यासाठी कायमचा अमूल्य ठेवा आहे.
त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांची मुक्त विद्यापीठाला अनुकूलता नव्हती. विधेयक बासनात गुंडाळले गेले. मात्र अडीच–तीन वर्षांनंतर श्री. शरदराव पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी लगेच १९८९ मध्ये नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची घोषणा केली आणि डॉ. राम ताकवले यांची पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती जाहीर केली. महाराष्ट्रातील लाखो अल्पशिक्षित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि नोकरीत बढतीचे दरवाजे उघडले. पुढे १९९५ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाल्याने आंतरराष्ट्रीय शिक्षणक्षेत्राशीही त्यांचा संवाद वाढला.
तंत्रज्ञान हे समाजपरिवर्तनाचे माध्यम
शिक्षणक्षेत्रातील विषमता कमी करण्याची क्षमता माहिती तंत्रज्ञानात विपुल आहे — ही सरांची भरभक्कम धारणा होती. ‘आयटी’ हे उद्याच्या पिढीचा ‘कानमंत्र’ ठरणार आहे हे ज्या मोजक्या शिक्षणतज्ज्ञांनी ओळखले, त्यात ताकवले सरांचे नाव अग्रक्रमाने येते.
महात्मा गांधींच्या ‘नई तलीम’चा गाभा कायम ठेवत, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड कशी घालता येईल — याबद्दल ते सतत वाचन व चिंतन करायचे.
तंत्रशिक्षण मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील आणि MKCL चे कार्यकारी संचालक श्री. विवेक सावंत यांनी सरांना MKCL चे संचालक म्हणून अधिकृत सहभागी करून घेतले. पत्नी श्रीमती प्रभावती ताकवले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत सरांनी स्वतःला या कार्यात पूर्णपणे झोकून दिले.
नव्वदाव्या वर्षीही तोच उत्साह
‘राष्ट्र सेवा दला’चे संस्कार झालेल्या ताकवले सरांना विधायक कार्य करणाऱ्या कोणत्याही युवक-युवतींबद्दल प्रचंड कौतुक असायचे. समोरची व्यक्ती कितीही अनोळखी असो — सर प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत करायचे, विचार लक्षपूर्वक ऐकायचे, चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करायचे. थोडा वेळ भेटले तरी माणूस प्रेरित होऊन जायचा.
वयाच्या नव्वदाव्या वर्षीही भेटणाऱ्यांशी सर नेहमीच्याच उत्साह आणि आशेने नवनवीन शैक्षणिक प्रयोगांबद्दल माहिती घेत राहायचे. त्यामुळेच वृद्धत्वाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांची मनाची शांतता व प्रसन्नता टिकून राहिली.
डॉ. राम ताकवले सरांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या भरीव कार्यकर्तृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
— प्रशांत कोठडिया १३ मे २०२६
📖 याच विषयावर विजय गायकवाड यांचे लेखही वाचा: मराठी → ज्ञानसूर्याचा अस्त… पण परिवर्तनाची ज्योत अजून जिवंत आहे English → The Sun of Knowledge Has Set… But the Flame Still Burns

