“आंबेडकरवादी स्वाभिमानाची विरासत घेऊन विद्रोही चळवळीला नवे स्वरूप देण्याची गरज आहे.“

नांदेड येथील २०व्या विद्रोही साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या राहुल एस.एम. प्रधान यांचे अध्यक्षीय भाषण ‘कृषी पर्व’ विशेष प्रकाशनात प्रसिद्ध होत आहे. हे भाषण केवळ साहित्यिक चर्चेचे माध्यम नसून, आंबेडकरवादी प्रतिरोधाच्या चळवळीला आगामी १५ वर्षांसाठी दिशादर्शक ठरणारा महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
२० व्या विद्रोही साहित्य संम्मेलनाचे संपूर्ण भाषण (Full Speech of 20th Vidrohi Sahitya Sammelan)
प्रास्ताविक (Introduction)
सप्रेम जय भीम (With love, Jai Bhim),
मी राहूल एस एम प्रधान, आंबेडकरी चळवळीसाठी (Ambedkarite movement) हयात घातलेल्या आणि आपल्या आयुष्याचं बलिदान केलेल्या सिद्धार्थ प्रधान यांचा मी मुलगा आहे. लोक आपल्या लेकरांना वारश्यात सत्ता संपत्ती देतात. माझ्या बापाने मला आंबेडकरी विचारधारेची दौलत दिली आहे. पँथरच्या चळवळीचा (Panther movement) लढाऊ बाणा दिला आणि आत्मसन्मानाने जगण्याची विद्रोही वृत्ती दिली. हा वारसा माझ्या बापाला बाबासाहेबांकडूनच मिळाला होता. येनकेनप्रकारे आपण सर्वच जण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, त्यांच्या विचारांचे आणि त्यांच्या व्हिजनचे कृतीशील वारसच आहोत.

आणि म्हणून आज २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातल्या नांदेड शहरात आयोजित होत असलेल्या या २० व्या विद्रोही साहित्य संम्मेलनाचा (20th Rebel Literary Conference) स्वागताध्यक्ष या नात्याने मी तमाम नांदेडवासीयांच्या वतीने, नांदेडला आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून अभेद्य ठेवलेल्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिविरांच्या वतीने आपल्या सर्वांचे आंबेडकरी विचारधारेच्या कृतीशील वारसदारांचे मनापासून स्वागत करतो.
जय भीम दोस्तहो, जय भीम या दोन शब्दांतच सर्व काही येतं. आपलं अख्खं जगणं आणि मरणं या दोन शब्दांच्या भोवतीच गुंफलेले आहे. जगभरातल्या शोषित पिडीतांच्या यल्गाराचा आवाज, संविधानाचा जागर आणि नवनिर्मितीची हाक सर्व काही जय भीम या दोन शब्दांत सामावलेली आहे. विद्रोहाचा खरा आवाज आणि त्याचा जयघोष जर कुठे असेल तर तो फक्त जय भीमच आहे. म्हणून माझा आग्रह आहे की, या विद्रोही साहित्य संम्मेलनाची सुरूवात म्हणून स्वागतासाठीचा माझा क्रांतिकारी जय भीम आपण कबूल करावा.
विद्रोही साहित्याचा ऐतिहासिक पाया (Historical Foundation of Rebel Literature)
मुंबईच्या धारावीतल्या संघर्षशील भूमीवर जेव्हा महाकवी बाबूराव बागूलांनी जमीनीवर बसून पहिल्यांदा साहित्य संम्मेलन पाहीले होते, भाषण केले होते. तेंव्हा खऱ्या अर्थाने क्रांतीसूर्य जोतिबांनी लिहीलेल्या ‘घालमोड्या दादा’ या पत्राची राजकीय कृती २० शतकाच्या अखेरीस आकाराला आली होती. तात्यासाहेबांनी लिहीलेले ते पत्र आजही मूलगामी समाज परिवर्तनाचा प्रेरक जाहीरनामा आहे. त्यातूनच अब्राह्मणी साहित्याची चळवळ आणि विचारधारा जन्माला आली. त्या विचारधारेतूनच जन्म झाला या विद्रोही साहित्य संम्मेलनाचा आणि त्यांच्या सशक्त चळवळीचा.

त्यानिमित्तानेच येत्या दोन दिवसांत विविध अभ्यासक आणि विचारवंतांकडून विद्रोही साहित्य चळवळीची अवस्था काय आहे? यावर वांझोटी आत्मटिका करत बसण्यापेक्षा, येत्या पंधरा वर्षात विद्रोही साहित्य चळवळीने काय केले पाहीजे? बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात (technological era) जिथे भांडवली सत्ता (capitalist power) दिवसेंदिवस अधिक कठोर आणि बलवान होत चालली आहे, त्या काळात विद्रोही साहित्य चळवळीने राजकिय हस्तक्षेप (political intervention) मांडणारी आणि राजकीय कृती करणारी कोणती भूमिका घ्यायला पाहिजे. याचे व्हिजन, याचा रोड मॅप (roadmap) तयार करण्याच्या दृष्टीने बोलणे अत्यावश्यक आहे.
कारण, खूप झाली आत्मटिका किती दिवस आपण एका केसाचे शंभर भाग करून तपासत बसणार आहोत. किती दिवस अजून आपण शाब्दिक बुडबुड्यांच्या फुग्यांना गोंजारत आपला ऑर्गजम मिळवत राहणार आहोत. आता भूमिकाही बदलाव्या लागतील, आपला विचार आणि आपली कृती बदलावी लागणार आहे.
विद्रोही चळवळीचा प्रवास (Journey of the Rebel Movement)
जे झाले ते झाले. अनेक अडचणी, अनेक अडथळे पार करत विद्रोही साहित्य आज ज्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, ती झेपही काही कमी कमालीची नाही. खूप मोठी झेप आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे कौतुक तर करायला हवं. सातत्यपूर्ण नकारात्मक भावनेत (negative emotions) राहून आपण कोणतीही प्रगती साधू शकणार नाही. प्रगती साधायची असेल तर आपल्याला खुश रहावे लागेल. जी व्यक्ती, जो समाज खुश राहतो, आनंदी राहतो, आनंदाच्या नव्या व्याख्या शोधतो, त्याचे नवीन मार्ग जन्माला घालतो तेंव्हा तो स्वतःसोबत सर्वांचाच विकास करत जातो.
मुळात विद्रोहाची सुरूवातच यासाठी झाली होती. आपल्याला दुःखात जगायला भाग पाडणाऱ्या व्यवस्थेविरोधात बंड करून आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आम्हालाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवण्यासाठीचाच तर लढा होता आणि आहे. म्हणून आजच्या या विद्रोही साहित्य संम्मेलनाची प्रासंगिकता अधिक महत्त्वाची वाटते आहे.
तरी एक बरंय अजून विद्रोहीची अवस्था मराठी ब्राह्मणी साहित्य संम्मेलनासारखी झालेली नाही. अध्यक्ष निवडीचे इथे फालतू वाद नाहीत. साहित्य संम्मेलनाच्या नावाखाली कोणताही निरर्थक राजकीय मुद्दा घेऊन एखाद्या म्हशीने कडबा चावत बसावा तसा कोरोना वायरसचा संसर्ग अजून तरी विद्रोहीला झालेला नाही. आणि भविष्यात कधीच होणार नाही ही प्रामाणिक अपेक्षा ही आहे. कारण, ज्या साहित्याचा उगमच माणूसपणाच्या दृष्टेपणासाठी झालेला आहे.
मराठी साहित्य संम्मेलनावर टीका (Critique of Marathi Literary Conference)
त्या संम्मेलनात एकजात सगळे परस्पर प्रशंसा क्लबवाले कवी, लेखकांचीच गर्दी असते. वर्षानुवर्षे तेच तेच लेखक येतात, तेच बोलतात, तेच एकमेकांचे ऐकत राहतात. स्वतःच्या पुस्तकाची स्वतःच्याच जातभाई वाल्या प्रकाशकाकडून पाचशे प्रतींची एक आवृत्ती छापून तत्वज्ञानात अॅरिस्टॉटलाही हरवल्याचा अविर्भाव घेऊन मिरवत राहतात.
हे तेच लोक आहेत जे आपल्या समजातीय समीक्षकांना गळ घालून फक्त आपल्याच पुस्तकाचे समीक्षण आपल्याच समजातीय वृत्तपत्रांतून छापूनही आणतात. त्याच्यावरच तासंतास बोलताना त्यांची जीभ थकत नाही. आळीपाळीने एकमेकांची प्रशंसा करत शासनाच्या मानधनाचे पाकीटे घेऊन आपापल्या कंपूत परतूनही जातात.
खरं तर या घालमोड्या दादांवर टिका करण्याची माझी जराही इच्छा नाही. पण, या अखिल मराठी साहित्य संम्मेलनाने मागच्या वीस-एक वर्षांत कोणते भरीव काम केले? कोणते मूलगामी साहित्य निर्माण केले? कोणती नवीन विचारधारा जन्माला घातली? या मंचावरून कधी सरकारी व्यवस्थेच्या अनास्थेवर, अन्यायी वागण्यावर आवाज तरी उठवला आहे का? तर बिल्कूल नाही. म्हणून सरकारचे एजंट असलेल्या अशा बटीक साहित्य संम्मेलनावर टिका करणे क्रमप्राप्त ठरते.
विद्रोहीचे वेगळेपण (Uniqueness of the Rebel Movement)
आणि इथेच विद्रोही साहित्य चळवळीचे वेगळेपण ठळकपणे उठून दिसते. विद्रोहीच्या मंचावर फक्त लेखक नसतात. या मंचाने कायम भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेची किंम्मत स्वतःचे घरदार, स्वतःचे आयुष्य, आपल्या कुटूंबाची सुरक्षा, त्यांचे जगणे आणि त्यांचे भविष्य पणाला लावून मोजलेली आहे.
इथे बोलणारे ॲक्टिव कार्यकर्ते (active workers) असतात. नुसत्या लिहीत्या हाताने क्रांती होत नसते. त्या हातांना मातीत रुतून क्रांतीची बीजे रोवावी लागतात. तेच लोक इथे मंचावर असतात आणि ऐकणारे असतात कार्यकर्ते, आंबेडकरी चेतनेचे महान कार्यकर्ते. जे थेट बोलतात. जिथे चूक तिथे चूक म्हणण्याची हिम्मत ठेवतात. अन्यायाविरोधात कृतीशील वागतांना स्वतःचे हितसंबंध जपण्याची ब्राह्मण्यवादी वृत्ती विद्रोही चळवळीत नाही, म्हणून विद्रोहीची चळवळ महान ठरते.
बदलत्या काळातील आव्हाने (Challenges in Changing Times)
पण, बदलत्या काळात आता विद्रोहीची चळवळीने नव्याने मांडण्याची गरज निर्माण झालेली आहे. नव्या पीढीशी जोडून घेतांना साठोत्तरी, नव्वदोत्तरी सारख्या संकल्पना आपण अजून किती दिवस वापरत राहणार आहोत? बरं, जग मिलेनीअल्स, अल्फा, जेन झी (Millennials, Alpha, Gen Z) च्या पुढे जात आहे.
दर एक दशकाला नव्हे तर दर पाच-एक वर्षांला आता तंत्रज्ञान बदलत आहे. भाषा बदलत आहे. नव्या पीढीची माध्यमं बदलत चालली आहेत. माझ्यासारख्यांचा जन्म झाला, तेंव्हा इंटरनेट तर सोडा टेलिफोनच्या वायरी रांगत होत्या. नांदेडमध्ये पहिला पी.सी.ओ. यायला नवं शतक उजाडायला लागले होते.
आम्ही तरूण झालो तेंव्हा ऑर्कूटची चलती होती. लोक ब्लॉग लिहीत होते. कॉर्पोरेट सेक्टर उदयाला येत होते. आयटी इंडस्ट्री बूमिंग वर होती. शेतीत जी.एम. सीड्स (GM seeds) आणला जाण्याचा काळ होता. तो आता आम्ही चाळीशीत आलेलो असताना आमचा आम्हाला मिड लाईफ क्रायसीस (mid-life crisis) सोडवता सोडवेना झाला आहे.
एकेकाळी याहू, मेसेंजर वापरणारे आम्ही आता इंस्टाग्राम कसे वापरावे, थ्रेड कसे आणि कशासाठी वापरले जाते, हे देखील नीट कळत नाही. विद्रोह कुणाचा भारी होता? साठोत्तरी वाल्यांचा, की नव्वदोत्तरी वाल्यांचा यातच आपले साहित्य अजूनही अडकलेले आहे.
नव्या पिढीशी जोडणी (Connecting with New Generation)
केवळ पी.एचडी. च्या थेसीस लिहून आपल्या विद्यापीठातल्या नोकऱ्या पक्क्या करण्यासाठीचे प्रयोजन आणि अशा प्रयोजनांनी २०३० सालातली विद्रोहीची चळवळ उभी राहणार आहे का? नाही ना! या प्रश्नावर आपण सखोल चिंतन केलेच पाहीजे. हा माझा आग्रह आहे आणि कायम राहील.
कारण, आपल्याला नव्या पिढीची भाषा, त्यांची माध्यमं, त्यांची वृत्ती शिकावी लागेल. त्यांच्यासोबत संवाद करण्याची नवी लाईन मांडावी लागेल. किती दिवस आपण आपल्यातच बोलत बसणार आहोत. किती दिवस आपण तीच ती जुनी भाषा, जुनी टर्मिनोलॉजी (terminology) वापरत बसणार आहोत.
जर नवीन युगाची, नवीन तंत्रज्ञानाची, नव्या पीढीची भाषा आपल्याला समजत नसेल तर ती शिकून घ्यावी लागेल आणि शिकता येत नसेल तर आपण आपल्या जागा स्वतःहून रिकाम्या केल्या पाहीजेत. ज्याला नवीन शिकता येत नसेल, नवीन काही घडवण्याची, नव्या सृजनाची ताकद नसेल त्यांना विद्रोही म्हणता येणार नाही. त्यांना विद्रोही म्हणवून घेण्याचा हक्क देखील नाही.

बौद्ध विचारधारेचे महत्त्व (Importance of Buddhist Ideology)
बाबासाहेबांनी अगदी पुराव्यांनिशी स्पष्ट मांडणी करून ठेवलेली आहे की, आपल्या देशाचा झगडा हा थेट वैदिक विरूद्ध बौद्ध असाच आहे. या झगड्यात बाबासाहेबांनी बौद्ध ही बाजू अतिशय तार्किकपणे विचार करूनच निवडली.
आजच्या काळात ज्या परिस्थितीत आपण जगतोय, त्या काळात जो व्यक्ती बौद्ध बाजूने उभा राहणार नाही तो थेट वैदीकच आहे, असेच मानले पाहीजे. जोपर्यंत आपण बौद्ध म्हणून या लढ्यात उतरणार नाही तोपर्यंत ना आपण आंबेडकरवादी ठरू शकतो, ना विद्रोही. त्याशिवाय आपल्या लढ्याला सार्वभौमत्व मिळेल ना कोणत्याही प्रकारचे क्रांतिकारी अधिष्ठान.
हे सगळे फक्त तेंव्हाच घडू शकते, जेंव्हा बुद्धाचे क्रांतिकारी रुप आपल्याला नीट कळेल, तेंव्हाच बुद्धाची करूणा ही मानवतेचा संदेश देणारी आहे. ना की, उठ बस पुजा पाठ करणारी. बुद्धाकडे जाण्यासाठी थेट रस्ता आहे विद्रोहाचा. त्याला शॉर्टकट नाही. त्यासाठी आंबेडकर नावाच्या महामार्गाचाच वापर करावा लागतो.
विद्रोही मंचाची नवी भूमिका (New Role of Rebel Platform)
आणि म्हणून २० व्या विद्रोही साहित्य संम्मेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी अशी इच्छा व्यक्त करतो की, विद्रोहीचा हा मंच येत्या काळात फक्त भाषणांचा मंच बनून न राहता, तो नवनवीन कलाकारांना त्यांच्या नवनवीन आर्ट फॉर्म्सना (art forms) वाव देणारा मंच बनला पाहीजे.
इथे नवीन सृजन झाले पाहीजे. नव्या राजकीय भूमिका मांडल्या गेल्या पाहीजेत. नव्या माध्यमांवर चर्चा झाली पाहीजे. आर्टीफीशिअल इंटेलिजंस (Artificial Intelligence) ने अख्खं जग व्यापून टाकले आहे. अनेक नोकऱ्या आता कालबाह्य होणार आहेत आणि त्याच वेळी नवीन कार्यक्षेत्रे पण डेवलप होत आहेत. आपल्याला त्यांची माहीती तरी आहे का? आणि असेलच माहीती तर, आपल्याकडे कृती कार्यक्रम काय?
आज झोमॅटो, स्विगी, ब्लिंकीट, ओला, ऊबेर, रॅपिडो सारख्या कंपन्यात मागासवर्गातली तरुण पोरं पोरी तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. आपल्याकडे काय फक्त या तरुण वर्गाला डिलीवरी पर्सन (delivery person) किंवा ड्रायवर बनवून ठेवण्याचाच कट आहे का? एक प्रश्न काढायला गेलो तर हजार प्रश्न आहेत. त्यावर चर्चा करण्याची हिम्मत आणि बुद्धी आपल्याला दाखवावी लागेल. म्हणून विद्रोहीच्या मंचाची येत्या काळातील आखणी आणि मांडणी तश्याच पद्धतीने व्हावी, ही मी आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो.
नव्या कलाकारांची भूमिका (Role of New Artists)
मान्य आहे, ही जागा, मंच आपण सर्व लोक सध्या रांगतोय, धडपडतोय, चुकतोय, सावरतोय, पण जमीनीत खोल मुरत आहोत. त्यांची कविता, त्यांचे प्रकार, त्यांच्या योजना सर्व तरूण आहेत. त्या ऊन्हात तापून लख्ख होत आहोत. त्यांच्या कविता, गीत, संगीत, रॅप सर्व काही परंपरावाद्यांच्या पचनी पडणारं नसलं तरी, परंपरा मोडणाऱ्यांना फारसं पटतंय असे नाही. पण, प्रयत्न जोरदार आहे. ते सतत हॅमर होत राहील. आणि एक दिवस ते तुम्हाला कळू लागेल. मग आवडू लागेल.
मान्य आहे, नवीन मुलं-मुली उभे राहतात, चित्र काढतात, रंगवतात त्यांचे विषय वेगळे आहेत. पण, त्यांनी कवितेचे चित्र बनवले आहे. चित्रांचा सिनेमा बनवत आहेत. समाजात असलेले सर्व सुष्ट आणि दूष्ट ब्रशच्या फटकाऱ्यांत उभे करत आहेत. आता त्यांच्या प्रेरणा युरोप, अमेरिका, रशियातून येत नाही तर इथेच आहेत. चळवळी, कलाकार, कार्यकर्ते, समाज, माणसे, वाद-विवाद, विचार, राष्ट्र, संविधान हातात हात घालून घडत असतात.
आपल्यालाही आपल्याच हातांतून प्रेरणा मिळेल असे कार्य आत्ताच्या पीढीने पुढच्या पीढीसाठी करवून ठेवायचे आहे. या साहित्याची पूर्वअट नकार आणि विद्रोह आहे. त्याच मार्गाने वाटचाल करावयाची आहे. विद्रोह ही अवस्था आहे. ती बदलते. वैज्ञानिक अर्थाने अपटूडेट (update) व्हायला हवे.
विद्रोही साहित्याची दिशा (Direction of Rebel Literature)
आता आम्हास नुसते भाष्यकार व्हावयाचे नाही. पुन्हा एकदा गूढवादात अडकलेले, अज्ञेयतेकडे झुकलेले आणि अदृष्य कर्विपाकाच्या अभिव्यक्ततेकडे झुकलेले साहित्य निर्मायचे नाही. समता-बंधुता विज्ञान आमच्या कलाकृतीचा पाया आहे असे म्हणत, पुढे जायचे आहे. भूत वर्तमान भविष्य यामधल्या सूर बदसूरांची सिंफनी बनवण्याचे काम साधायचे आहे.
व्यक्ती, समष्टी, सृष्टी, षड्विकार, वाद, तत्वज्ञान यांचा केंद्रबिंदू माणूस असतो. याच माणसाला पुन्हा मोठे करायचे आहे. तो बिंदू साधायचा आहे. हा बिंदू म्हणजेच समष्टी. या समष्टीसाठीचा अट्टाहास आणि त्यातून फुलणारा कलाविष्कार म्हणजेच ही विद्रोही साहित्याची चळवळ.
अंतिम संदेश (Final Message)
हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे, अनामवेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी कांडून खावा माणसावरच सुक्त रचावे माणसाचेच गाणे गावे माणसाने.
**जय भीम, जय संविधान, जय हिंद, जय भारत

