राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन तथा खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि काटोल तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागांना भेट देऊन आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची बारकाईने पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांकडून इंडो-इस्राइल पद्धतीच्या ठिबक सिंचन, जैविक खतांचा वापर, बेन्डिंग तंत्र आणि उच्च उत्पादनासाठी अवलंबलेल्या वैज्ञानिक पद्धतींची सविस्तर माहिती जाणून घेतली.

या दौऱ्यात मंत्री गोगावले यांच्यासमवेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉ. देवानंद पंचभाई, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. मेघा डहाळे, विभाग प्रमुख डॉ. विनोद राऊत तसेच मनोज जवंजाळ यांच्यासह फलोत्पादन आणि कृषी विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
**कोहळी येथील सुषमा वानखडे यांच्या बागेला भेट**
सर्वप्रथम कळमेश्वर तालुक्यातील कोहळी गावातील शेतकरी सुषमा सुभाषराव वानखडे यांच्या फळबागेला मंत्री महोदयांनी भेट दिली. ही बाग भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे. येथे इंडो-इस्राइल तंत्रज्ञानाचा अवलंब करून संत्रा लागवड केली आहे. विशेष म्हणजे, बेन्डिंग पद्धत, रोटावेटर आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर, तसेच जैविक खतांचा अधिकाधिक वापर अशा पर्यावरणपूरक पद्धतींची अंमलबजावणी केली जाते. मंत्री गोगावले यांनी या सर्व तंत्रांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी वानखडे यांच्याकडून तपशील जाणून घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

**हातला येथील धीरज जुनघरे यांच्या ४५ हेक्टर बागेची पाहणी**
त्यानंतर काटोल तालुक्यातील हातला गावातील प्रगतीशील शेतकरी धीरज जुनघरे यांच्या विशाल संत्रा बागेला भेट देण्यात आली. एकूण ४५ हेक्टर क्षेत्रावर इंडो-इस्राइल पद्धतीने आधुनिक ठिबक सिंचन प्रणाली आणि वैज्ञानिक लागवड तंत्राचा वापर करून संत्रा पिक घेतले जाते. यामुळे उच्च दर्जाचे आणि मुबलक उत्पादन मिळते. मंत्री गोगावले यांनी बागेची प्रत्यक्ष फिरून पाहणी केली आणि शेतकरी जुनघरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या यशोगाथेची माहिती घेतली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर आणि उत्पादकता वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
**प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट**
या दौऱ्याच्या शेवटी मंत्री गोगावले यांनी काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधन कार्याची माहिती घेतली. केंद्रातील वैज्ञानिक उपक्रम आणि फळबाग विकासासाठी चालू असलेले प्रयोग पाहून त्यांनी केंद्राच्या टीमचे अभिनंदन केले.
मंत्री गोगावले यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, राज्य शासन फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, इंडो-इस्राइल प्रकल्प आणि इतर योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवलंबावे, जेणेकरून उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. या भेटीमुळे जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

