एक असाहय आई… एक झुंजणारी संशोधक… आणि एक बदललेलं आयुष्य. ब्राझीलच्या खेड्यातून युरोपच्या प्रयोगशाळेपर्यंतचा हा अविश्वसनीय प्रवास आहे — फक्त एका छोट्या मदतीच्या बळावर

आई “आई” असते…… !!!!
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचे दिवस होते. जगभर सगळीकडे अस्वस्थता पसरली होती. त्या काळात मला LinkedIn वर एका स्पॅनिश मुलीचा मेसेज आला.
“मला एक मदत हवी आहे. मी युरोपियन कमिशनच्या मेरी-क्युरी फेलोशिपसाठी तयारी करतेय आणि मला तुझी मदत हवी आहे. मी एकदा प्रयत्न केला होता पण मला फक्त 70 स्कोर मिळाला. ही फेलोशिप मिळवण्यासाठी किमान 90 पेक्षा जास्त स्कोर हवा. मला समजलं आहे की तुला ती तीनदा मिळाली आहे. मला फेलोशिपचं रिसर्च प्रपोजल तयार करायला मदत करशील का? तुझा अनुभव माझ्यासाठी खूप उपयोगी पडेल.”
मी प्रयत्न करतो असं म्हटल्यावर तिने समोरूनच विचारलं “फी किती द्यायची?”
सुरुवातीला पैसे घेऊन मदत करणं योग्य वाटलं नाही म्हणून मी नकार दिला. पण ती ठाम होती.
ती म्हणाली, “मला योग्य वेळ आणि मार्गदर्शन हवं आहे आणि त्याची फी मी नक्की देणार.”
शेवटी तीन महिने, आठवड्यातून एका तासाचा सेशन आणि 250 युरो फी असं ठरलं.
तीन सेशन्स झाल्यावर त्या मुलीने पुन्हा विचारलं “माझी एक मैत्रीण ब्राझीलमध्ये आहे, तिलाही मदत करशील का? आम्ही दोघी एकाच सेशनमध्ये येऊ, म्हणजे वेळ वाचेल. ती सुद्धा फी द्यायला तयार आहे.” होय-नाही करत शेवटी ती अटही मान्य केली आणि दोघींचे एकत्र सेशन्स सुरू झाले.
ब्राझिलियन मुलगी जॉईन झाल्यावर मात्र माझी घोर निराशा झाली. तिचं इंग्लिश इतकं कमजोर होतं की एकच गोष्ट पाच-सहा वेळा सांगावी लागत होती.
दोन सेशन्स झाल्यावर मी स्पॅनिश मुलीला मेसेज केला “तुझ्या मैत्रिणीला मदत करणं कठीण आहे. तिचं इंग्लिश खूपच कमजोर आहे.” ती म्हणाली “हो, मलाही ते समजतंय. पण मला वाटतं तू तिला खरंच मदत करावी.”
पुढच्याच मिनिटाला तिने विचारलं “मी कॉल करू का?”
कॉलवर बोलणं झाल्यावर मात्र मी ठरवलं या ब्राझिलियन मुलीला काहीही करून ही फेलोशिप मिळवून द्यायची.
मी स्पॅनिश मुलीला सांगितलं “जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तिला माझे बँक अकाउंट डिटेल्स देऊ नकोस.”
पुढे दोघींनी सगळे सेशन्स पूर्ण केले. ब्राझिलियन मुलगी खूप धडपड करत होती. हळूहळू तिचं रिसर्च प्रपोजलही चांगलं तयार होऊ लागलं. दोघीही खूप sincere होत्या. जे काही काम सांगितलं ते पूर्ण करूनच पुढच्या सेशनला यायच्या. सेशन्स संपत आले तेव्हा ब्राझिलियन मुलीने फी साठी बँक अकाउंट मागितलं. मी फक्त म्हटलं “नंतर बघू.” दोघींचे रिसर्च प्रपोजल सबमिट झाले.
स्पॅनिश मुलीने नंतर कधीच मेसेज केला नाही. पण ब्राझिलियन मुलगी फी बद्दल मेसेज करत राहिली. मी काहीतरी कारण देत तिला टाळू लागलो. हळूहळू तिचे मेसेज येणं बंद झालं… आणि मीही हा विषय विसरून गेलो.
सहा महिन्यांनी स्पॅनिश मुलीचा मेसेज आला. “आज फेलोशिपचा रिझल्ट आला. मला 92 स्कोर मिळाला, तरीही फेलोशिप मिळाली नाही. माझ्या मैत्रिणीलाही मिळाली नाही. तिला तर फक्त 80 स्कोर मिळाला.” मला दोघींबद्दलही वाईट वाटलं.
ती पुढे म्हणाली “मला आता दुसरा जॉब मिळाला आहे. पण शक्य झालं तर तिला पुन्हा यावर्षी मदत कर. तिला या संधीची खरंच खूप गरज आहे.”
ब्राझिलियन मुलीचा मात्र एकही मेसेज आला नाही. तो आला तीन महिन्यांनी.
“मी पुन्हा प्रयत्न करणार आहे. प्लीज मला पुन्हा मदत कर. मागची आणि यावेळची फी मी पुढच्या तीन महिन्यांत शक्य होईल तशी देईन.” मी फीबद्दल काहीच बोललो नाही. फक्त म्हटलं “चला, आपण पुन्हा प्रयत्न करू.”
यावेळी मात्र त्या मुलीने इंग्लिश खूप सुधारलं होतं. तिची पीएचडी सायकॉलॉजीमध्ये झाली होती. तिचा रिसर्च मानवी संवेदना आणि कोविड उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर आधारित होता. माझ्यासाठी तो विषय खूप वेगळा होता.
तीन महिने तिने खरंच खूप मेहनत केली. अनेकदा ती बसमधून, कधी मॅकडोनाल्डमधून झूमवर सेशन जॉईन करायची. प्रपोजल सबमिट झाल्यावर तिने पुन्हा विचारलं “बँक अकाउंट प्लीज.”
मी म्हटलं “तुला फेलोशिप मिळाली की दे फी.” ती खूप विनवण्या करत राहिली पण मी ठाम राहिलो. खरं सांगायचं तर मलाही खात्री नव्हती की तिला मिळेल. त्या वर्षी या फेलोशिपसाठी जगभरातून दहा हजारांपेक्षा जास्त प्रपोजल्स आले होते. पुढे मी पुन्हा माझ्या उद्योगात बिझी झालो आणि हा विषय विसरून गेलो.
सहा महिन्यांनी सकाळी अचानक तिचा मेसेज दिसला
“My life has been changed overnight. Thanks for your tireless efforts and believing in me. We made it this time.”
मला ती सकाळ आजही आठवते. तो मेसेज वाचून मला इतकं हलकं आणि आनंदी वाटलं की जणू माझंच आयुष्य एका रात्रीत बदललं आहे.
पुढच्याच क्षणी तिचा तोच प्रश्न “तुझी फी?” मी फक्त इतकंच उत्तर दिलं “पहिला पगार झाल्यावर दे.”
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन झाला. बऱ्याच जणींनी आपल्या कर्तृत्वाबद्दल लिहिण्यापेक्षा इतरांना टोमणे मारण्यात आणि कमी लेखण्यातच जास्त वेळ घालवला.
ते पाहताना मला त्या ब्राझिलियन मुलीची आठवण झाली.
स्वतःच्या परिस्थितीचं कधी भांडवल न करता, कुणाकडे सहानुभूती मागितली नाही. आपलं दुःख न सांगता फक्त स्वतःमध्ये सुधारणा करत राहिली. एकदा अपयश आलं तरी पुन्हा उभी राहिली.
खरी कमाल मात्र तिच्या स्पॅनिश मैत्रिणीची होती.
स्वतःपेक्षा हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या मैत्रिणीसाठी ती एवढी धडपड करत होती. मी नाही म्हणलो होतो तेव्हा कॉल वरती खूप विनवण्या करत होती. मी ऐकणार नाही समजताच तिने मैत्रिणीची खरी स्टोरी सांगितली. ब्राझीलच्या एका खेड्यात वाढलेली ती मुलगी. लहानपणीच आई-वडील संर्गजन्य आजाराने गेले. आजीने वाढवलं. काम करत करत शिक्षण पूर्ण केलं. पुढे पीएचडी केली. लग्न झालं, मुलगी झाली. पण कोव्हिडने सगळं बदललं. नवरा कोव्हिडने गेला. पुढच्या महिन्यात आजीही गेली. दोन वर्षांच्या मुलीसोबत ती एकटीच राहिली. पीएचडी करूनही तिला जॉब मिळत नव्हता. पीएचडी करून ती मॅक्डोनाल्ड मध्ये मिळेल त्या पैशात जॉब करते, मुलीला सुद्धा संभाळायला तिला पैसे नसतात कि घरभाडे पण देऊ शकत नाही, अजून एका ठिकाणी रात्रपाळीचा जॉब ती शोधतेय. तुझी फी कमी आहे पण ती देईल तिने सांगितलेय रात्रीचा जॉब मिळाला कि जस शक्य होईल तशी सगळी फी देईन मी. पण मला मदत करायला सांग, तिलाही समजतंय कि तुला त्रास होतोय पण ती असह्य आहे. तिला नाही जमलं तर मी फी देईन. सुरवातीला मुलगी वाटणारी ती एक असाहय आई आहे हे समजल्यावर माझी पण खूप घालमेल झाली.
दिवसाला तीन-चार डॉलर कमावणारी ती आई…
फेलोशिप मिळाल्यावर एका रात्रीत महिन्याला सात हजार डॉलर पगार घेणारी संशोधक झाली होती.
इतक्या वेळा ती माझ्यासमोर ऑनलाईन मिटिंगला आली, पण एकदाही स्वतःच्या परिस्थितीबद्दल बोलली नाही. कधी सहानुभूती मागितली नाही. कधी कामात चुकारपणा केला नाही.
बस मधून, घरातून, अगदी मॅकडोनाल्डमधूनही तिने मिटिंग केल्या… पण कधी दोन मिनिटसुद्धा उशीर केला नाही.
पहिल्यांदा फेलोशिप मिळाली नाही तेव्हा मनात विचार आला होता अजून किती वर्षे हिच्या आयुष्यात असा संघर्ष असेल? पण तिने हार मानली नाही. दिवसाचे काम संपवून मुलीला सांभाळून रात्री उशिरापर्यंत फूड डिलिव्हरीचे काम करूनही पुन्हा उभी राहिली.
ब्राझीलमधून पुढे ती स्पेनला आली. फक्त देशच नाही… तिचं संपूर्ण आयुष्य बदललं.
जगाच्या त्या कोपऱ्यातही काही अनोळखी चेहरे रोजच्या जगण्यासाठी झगडत असतात. आपल्याला या ऑनलाईन जगात त्यांची कल्पनाही नसते. सगळेच हसरे चेहरे काहीतरी दुःख लपवत असतात
आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे लोक स्वतःच्या संघर्षाचे पोवाडे गाण्यात मग्न असतात, तिथे ही ब्राझीलची मुलगी शांतपणे आपला काळोख चिरत चालत राहिली.
पुन्हा सहा–सात महिन्यांनी तिचा मेसेज आला “आज माझा पहिला पगार झाला. आता तरी मला तुझी फी देऊ दे.” खरं सांगायचं तर या मेसेजच्या जगात आपण समोरच्याचा चेहरा पाहत नाही. त्याच्या डोळ्यातील थकवा, त्याच्या संघर्षाची सावली, किंवा आनंदाचा उजेडही आपल्याला दिसत नाही. या ऑनलाईन जगात समोर कधी न पाहिलेली, कधी न भेटलेली माणसंही शब्दाला इतकी पक्की असतात…
जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात, कधी न भेटलेली, कधी न पाहिलेली माणसंही आपल्या आयुष्याच्या प्रवासात नकळत सामील होतात. कधी फक्त एक छोटासा विश्वास म्हणून.
आणि मग लक्षात येतं आपण एखाद्याला दिलेली मदत कदाचित आपल्यासाठी एक छोटासा क्षण असतो… पण कुणाच्या आयुष्यात तोच क्षण संपूर्ण भविष्य बदलणारा ठरतो. कदाचित म्हणूनच… या जगात अजूनही एक असहाय आई जगरहाटीच्या काळ्याकुट्ट अंधारातही किमान एखादा काजवा दिसेल या आशेवर पुढची वाट चालत राहते.
मी फक्त एकच मेसेज केला “आज तुझ्या मुलीला जे अनेक दिवसांपासून घ्यायचं होतं ते घे.”
काही सेकंद शांतता होती… आणि मग तिचं एकच उत्तर आलं
“Thank you.”
डॉ. नानासाहेब थोरात
Dr-Nanaso Thorat

