वाढत्या शहरीकरणामुळे आपली शहरे वेगाने ‘काँक्रीटचे जंगल’ बनत चालली आहेत. पण नवी मुंबईमधील बेलापूरच्या सेक्टर ९ मध्ये नागरिकांच्या सामुदायिक प्रयत्नातून आणि शाश्वत विकासाच्या ध्यासातून एक सुंदर हिरवागार कोपरा फुलला आहे—’ॲग्रो गार्डन’! जैवविविधतेचे उत्तम उदाहरण असलेल्या याच निसर्ग उद्यानात येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी १६ व्या वार्षिक ‘वसंतोत्सवा’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. शहरवासीयांनी रोजच्या प्रदूषणातून एक दिवस सुट्टी घ्यावी आणि निसर्गाशी पुन्हा एकदा आपली नाळ जुळण्याच्या उद्देशाने गेल्या १६ वर्षांपासून हा महोत्सव साजरा केला जातो.

कला, निसर्ग आणि चवीचा सुरेख संगम यंदाचा वसंतोत्सव दिवसभर चालणाऱ्या विविध रंजक आणि माहितीपूर्ण उपक्रमांनी सजलेला असेल. निसर्ग फेरी, उद्यानातील फळझाडे आणि भाज्यांची ओळख यांसारख्या उपक्रमांमधून निसर्गाला जवळून अनुभवता येईल. यासोबतच मातीची भांडी बनवणे, निसर्ग छायाचित्रण, भरतकाम आणि नृत्याच्या विशेष कार्यशाळा महोत्सवात आहेत. पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांचे स्टॉल्स आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या चविष्ट घरगुती पदार्थांची मेजवानीही येथे असणार आहे.
‘भारूड-ए-बिबट’ हा कलाविष्कार यंदाचे विशेष आकर्षण आहे. सध्या सीबीडी बेलापूर परिसरात बिबट्याच्या वावराची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी भीती आणि अफवांना दूर सारण्यासाठी महोत्सवात ‘भारूड-ए-बिबट’ हा एक अत्यंत अनोखा आणि नाविन्यपूर्ण वन्यजीव कलाविष्कार सादर केला जाणार आहे. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील सहजीवनाचे महत्त्व आणि संवेदना लोककलेच्या अत्यंत प्रभावी माध्यमातून उलगडेल.

मातीचा सुगंध, झाडांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगीबेरंगी फुलपाखरांचा वावर अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषणापासून दूर, शुद्ध हवेत एक दिवस घालवण्यासाठी आबालवृद्धांनी वसंतोत्सवात आवर्जून सहभागी व्हावे. मानवनिर्मित शहरी उद्यानांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा निसर्ग सोहळा सर्वांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे! सर्व कार्यशाळा सशुल्क असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
कधी: रविवार, २२ फेब्रुवारी २०२६
वेळ: दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत
कुठे: ॲग्रो व्हेजिटेबल फार्म आणि बटरफ्लाय गार्डन, सेक्टर-९, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.
अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: जुई – ९८२०२२६१७१ किंवा राजीव ९८३३१०९४४२

ॲग्रो गार्डनविषयी
डंपिंग ग्राऊंड आणि उच्च दाबांच्या विजेच्या तारांच्या खाली असलेल्या प्लॉटवर गेल्या तीस वर्षात बेलापूरमधील सेक्टर ९ येथील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान आणि स्वखर्चातून नंदनवन फुलविले आहे. आजघडीला येथे तब्बल पन्नास जातींची फुलपाखरे आढळतात. विविध पक्षी, किटक आणि सरपटणा-या प्राण्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती, वेली, फुलझाडे आणि फळभाज्या, पालेभाज्यांची शेती या माध्यमातून शहराच्या मध्यभागी एक हिरवेगार निसर्ग उद्यान उभे राहिले आहे.

