शेतीवरचा भार उतरवायचा असेल, तर उद्योगाकडे वळावंच लागेल

जमीन वाढत नाही, लोकसंख्या वाढते आहे — विकेंद्रित कारखानदारी हाच महाराष्ट्रापुढचा मार्ग

शरद पवार | शब्दांकन : विजय गायकवाड

मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन (MEA) आयोजित ‘MEA International Business Expo 2027’ च्या लाँचिंग सोहळ्यात शरद पवार यांनी नवउद्यमी पिढीशी पुण्यात संवाद साधला. त्या भाषणाचं हे संपादित शब्दांकन.


जमीन तेवढीच, माणसं चौपट

मला आनंद एका गोष्टीचा आहे — ज्या कुटुंबांनी अनेक पिढ्या एकच व्यवसाय केला, त्या चौकटीबाहेर पडण्याचा विचार नवी पिढी आता करायला लागली आहे. आणि खरं सांगतो, त्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. आज इथे जी नावं वाचली गेली, त्यांपैकी जवळपास प्रत्येकाची — कधी स्वतःची, कधी वडिलांची, कधी आजोबांची — बांधिलकी जमिनीशी होती, शेतीशी होती.

हे मी गेली अनेक वर्षं महाराष्ट्रात जिथे जाता येईल तिथे सांगत आलो आहे. कारणही तसंच आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती आणि त्यातली ७० टक्के माणसं शेतीवर अवलंबून होती. आज ती लोकसंख्या १२० कोटींच्या पुढे गेली आहे. लोकसंख्या वाढली — पण जमीन वाढली का?

मुंबई-पुण्याच्या आजूबाजूला नजर टाकली तर उत्तर दिसतं. नवे रस्ते झाले, हजारो धरणं झाली, रेल्वे लाईन वाढल्या, औद्योगिक वसाहती वाढल्या. या प्रत्येक वाढीसाठी जमीनच गेली. जमिनीवरचं प्रेशर वाढतं आहे आणि उपलब्ध जमिनीचं क्षेत्र व टक्केवारी दोन्ही कमी होत आहेत. आजची लोकसंख्या पेलण्याची ताकद एकट्या शेतीक्षेत्रात उरलेली नाही. त्यावर पर्याय एकच — अन्य क्षेत्रांत जायचं.

कारखानदारी एका ठिकाणी नको, ती पसरली पाहिजे

मी राज्याचा प्रमुख होतो त्या काळात एक निर्णय घेतला होता. तेव्हा पुण्याच्या आसपास किर्लोस्करांची टेल्को, वसंतराव वैद्य यांची स्वस्तिक असे काही ठराविक कारखाने होते. लोक अभिमानाने सांगायचे — आमचं पुणे, आमचा महाराष्ट्र हा उद्योगधंद्यांचा. ते खरंही होतं. यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून ही सुरुवात झाली होती. कारखानदारी उभी राहिली नाही असं नाही — पण ती सीमित होती आणि महाराष्ट्राची गरज भागवणारी नव्हती.

म्हणून मी ठरवलं : आता नव्या कारखानदारांना फक्त पुण्यातच मदत करायची नाही. उद्योग केंद्रित असता कामा नये, तो विकेंद्रित स्वरूपात गेला पाहिजे. चाकणला मदत केली, जेजुरीला केली, बारामतीला केली, इंदापूरला केली, नगर रोडवर रांजणगावला कारखानदारी उभी करायला मदत केली. नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात पाऊल टाकलं की शिरवळला उद्योग येईल याची काळजी घेतली. पिंपरी-चिंचवड हे एकमेव औद्योगिक ठिकाण राहण्याऐवजी अनेक औद्योगिक बेस तयार झाले. पुढे नाशिक आलं, छत्रपती संभाजीनगरचं चिखलठाणा आलं, नांदेड आलं, नागपूर आलं.

याचा दुसराही एक फायदा झाला. उद्योग एकाच ठिकाणी केंद्रित होतो तेव्हा समस्या निर्माण होतात. त्या काळात राजन नायर या एका माणसाने पुण्याच्या इंडस्ट्रीला संकटात आणलं होतं — कारण त्याला एकाच भागात एकवटलेली इंडस्ट्री मिळाली. तीच इंडस्ट्री विकेंद्रित असती, तर तिथे राजन नायरसारखी माणसं तयार होत नाहीत. सत्ता जशी विकेंद्रित असावी लागते, तसंच औद्योगिकीकरण आणि अर्थव्यवस्थाही विकेंद्रित असावी लागते.

गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल माझे चांगले मित्र होते. आमच्यात एक अंडरस्टँडिंग होतं — फार मोठा कारखाना आला तर तो महाराष्ट्रात, छोटे आले तर गुजरातेत. अशा सहकार्यातून अनेक उद्योग आणण्याचा आम्ही प्रयत्न केला.

वर्ल्ड बँकेतल्या ओळखीतून आलेली ह्युंदाई

सत्तेत असो अथवा नसो, माझा एक स्वभाव होता. एक काळ असा होता की काहीही झालं तरी मी दरवर्षी अमेरिकेला जायचो आणि तिथे माझी दोन ठिकाणं ठरलेली असायची — वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनेटरी फंड. वर्ल्ड बँकेचं वैशिष्ट्य असं की शेती, उद्योग, अर्थकारण अशा प्रत्येक क्षेत्रातली चांगली माणसं तिथे काम करत असतात. मी त्यांना भेटायचो, मैत्री करायचो, सुसंवाद साधायचो. त्यातून आणखी माणसं भेटायची. याचा आपल्याला उपयोग कसा करून घेता येईल, हेच मी सतत बघत असे.

वर्ल्ड बँकेत असताना एक कोरियन गृहस्थ भेटले. तेही काहीतरी माहिती घ्यायलाच आले होते. ओळख झाली, पुढे मैत्री झाली. त्यांचं नाव चुंग जू-युंग. ते स्वतः ट्रक चालवायचे. नंतर त्यांनी ट्रकची बॉडी बांधण्याचं एक लहानसं युनिट काढलं. बॉडी बांधून थांबायचं नाही, ट्रकचं मशीनच तयार करायचं, असा विचार करून ते इंजिन बनवायला लागले. मी त्यांना सांगितलं — तुम्ही इथे या. शेवटी ते आले. ते मला नेहमी म्हणायचे, “Mr. Pawar, you can see my vehicle in America and in India too.” त्यांच्या व्हेइकलचं नाव — ह्युंदाई.

आज ह्युंदाई सगळ्या जगात पोहोचली आहे. ती फॅक्टरी खरं तर भारतात आणली होती, पण इथल्या राज्यकर्त्यांनी त्यावेळी पाठिंबा दिला नाही. मग मी जयललितांशी संपर्क साधला आणि सांगितलं, “हा एक चांगला इंडस्ट्रियल ग्रुप आहे, संधी द्या.” त्यांनी ४८ तासांत जमीन दिली आणि ह्युंदाईची फॅक्टरी मद्रासला गेली. ठीक आहे — मद्रास काय आणि महाराष्ट्र काय; देशाचा विचार करायची वेळ येते तेव्हा व्यापक दृष्टी ठेवावीच लागते.

अशी माणसं जगाच्या पाठीवर कुठेही भेटतात. एकदा अमेरिकेत विमानातून उतरून बाहेर आलो, तर एकाने नमस्कार करून “राम राम साहेब” म्हटलं. म्हटलं, अमेरिकेत राम राम म्हणतोय म्हणजे आपल्याकडचंच कुणीतरी. बोलावून घेतलं. ते धाराशिवचे देशमुख होते. विचारलं, “इथे काय करता?” म्हणाले, “लहानसं रेस्टॉरंट टाकलंय. लोकांना भारतीय जेवण देतो आणि जेवणानंतर बिडी देतो.” म्हटलं, “बिडी कशासाठी?” म्हणाले, “काहीतरी वेगळं. इथे सिगारेट ओढतात; आम्ही सांगतो सिगारेटपेक्षा बिडी चांगली, ही इंडियन सिगार आहे. अमेरिकन लोक इंडियन सिगार घ्यायला लागले आणि धंदा वाढला.”

गिरण्या गेल्या, पण मुंबई संपली नाही

मुंबई एकेकाळी भारताची औद्योगिक राजधानी होती. १२० टेक्स्टाईल मिल होत्या. आज एक आहे. बाकीच्या सगळ्या गेल्या — त्याला अनेक कारणं आहेत.

मुंबईतली टेक्स्टाईल इंडस्ट्री संपते आहे हे दिसलं तेव्हा मी विचार केला — सिंगापूरमध्ये कुठे कारखाना आहे? सिंगापूर ही फायनान्शियल सिटी आहे आणि त्या जोरावर तो आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश झाला. आपल्याकडे असं काही करता येईल का? आणि मी ठरवलं — मुंबईला फायनान्शियल सिटी बनवायची.

आज ज्याला बीकेसी म्हणतात, तिथे त्या वेळी काहीही नव्हतं. तिथे खारफुटी होती. एक उद्योग नव्हता, एक घर नव्हतं. ठरवलं की हा भाग फायनान्शियल सिटीत रूपांतरित करायचा. पहिलं काम — मुंबईच्या डायमंड इंडस्ट्रीला जागा हवी होती. अरुणभाई मेहता त्या संघटनेचे प्रमुख होते; बी. अरुणकुमार हे त्यांच्या कंपनीचं नाव, अकरा हजार कोटींची हिऱ्यांची निर्यात. ते आज हयात नाहीत. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, “डायमंड इंडस्ट्री आम्हाला इथे वाढवायची आहे.” मी म्हणालो, “जागा देतो.” ते म्हणाले, “फार महाग आहे.” विचारलं, “किती पाहिजे?” म्हणाले, “पंचवीस एकर.” म्हटलं, “पैशांचं काय?” म्हणाले, “कमीत कमी किंमत द्या.”

मी म्हणालो, “एका अटीवर. एक एकर एका रुपयाला देतो — पण तुम्ही पंचवीस नाही, पन्नास एकर घ्या.” त्यांना पन्नास एकर जमीन एका रुपयाने दिली आणि तिथे डायमंड बोर्स हे हिऱ्यांचं मोठं युनिट उभं राहिलं. बँकांनाही सांगितलं होतं, “स्थानिक किमतीत जमिनी देतो, तुम्ही बँक इथे आणा.” आज बीकेसीत गेलात तर देशातल्या सगळ्या बँका तिथे दिसतात.

मुंबईचं टेक्स्टाईल केंद्र बंद झालं, पण मुंबई देशाची फायनान्शियल सिटी झाली आणि आज जगात तिची किंमत आहे. म्हणून जे बदल करायची गरज आहे ते धाडसाने केले पाहिजेत. पिढीजात उद्योगात सगळ्या कुटुंबाने एकवटू नये — एखाद्याने तो सांभाळावा आणि बाकीच्यांनी दुसरे व्यवसाय उभे करावेत. विकेंद्रित कारखानदारी हेच यावरचं उत्तर आहे आणि त्यासाठी एकमेकांना मदत करण्याची नितांत गरज आहे.

घरातली स्त्री द्रष्टी असते

लोक मला विचारतात — तुम्ही सगळे शेतकरी घरातून आलात, इथपर्यंत कसे आलात? तुमच्याच एका महिला उद्योजकांच्या कार्यक्रमाला मी आलो होतो; त्या कार्यक्रमाचं मला भयंकर महत्त्व वाटलं. कारण कुटुंबातली स्त्री द्रष्टी असते. ती सबंध घर दुरुस्त करू शकते, सुधारू शकते, पुढे नेऊ शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी आई.

आमचं घर लहान नव्हतं — आठ भाऊ, चार बहिणी; बारा मुलं. त्या काळी फॅमिली प्लॅनिंग नव्हतं. पण आईने आम्हा सगळ्यांना शिकवलं आणि कामाला लावलं. मी बारामतीला शिकत असताना रविवारी दौंडला आठवड्याचा बाजार भरायचा. आई मला घरचा भाजीपाला आणि कडधान्य घेऊन दौंडला पाठवायची, ते विकून यायचं. त्याचा एक परिणाम असा झाला की तिथल्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांशी ओळखी झाल्या. १९६७ साली मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा तेच छोटे विक्रेते माझा प्रचार करायला लागले — “आपल्यासारखाच भाजी घेऊन यायचा,” असं सांगत.

माझे मोठे बंधू वसंतराव निष्णात वकील होते. दुसरे बंधू प्रवरानगरला नोकरीला होते, पगार होता जेमतेम १२० रुपये; पण शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांबद्दल त्यांना विलक्षण आस्था होती. त्यांनी त्या कामात लक्ष घातलं, आईनेही प्रोत्साहन दिलं आणि ऊस-साखरेच्या व शेतीच्या क्षेत्रात त्यांचा देशात नावलौकिक झाला. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री दिली — दिनकरराव उर्फ आप्पासाहेब पवार.

तिसरे बंधू अनंतराव — अजितचे वडील. कुटुंबातले सगळ्यात अभ्यासू, हुशार आणि स्वाभिमानी. फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना पहिल्या दिवशी प्रिन्सिपलच्या भाषणात शेतकऱ्यांची काहीतरी टिंगल झाली. बंधूराज उभे राहिले आणि गावच्या भाषेत जे सुनवायचं ते सुनावलं. परिणाम — त्यांना कॉलेजमधून बाहेर काढलं. माझी आई अतिशय कडक. अर्धवट शिक्षण सोडलेलं तिला चाललं नाही; तिने सांगितलं, घरात राहायचं नाही. ते मुंबईला गेले, एका मित्राच्या ओळखीने व्ही. शांताराम यांना भेटले, राजकमल स्टुडिओत काम करू लागले आणि काही वर्षांनी शेतीत परतले.

त्यानंतरचे बंधू माधव. त्यांना इंजिनिअर व्हायचं होतं, पण प्रवेश मिळाला नाही — त्या काळात साठ टक्के म्हणजे फार झालं. तहसीलदार कार्यालयात वर्षभर कारकून म्हणून काम केलं, पैसे साठवले आणि इंग्लंड गाठलं. तिथे नोकरी करत इंजिनिअर झाले, परत येऊन ‘अजय मेटाकेम’ ही लहानशी इंडस्ट्री काढली; तिचं युनिट आजही पुण्यातच आहे. पुढचे बंधू सूर्यकांत — मंत्रालयात नोकरी करून पैसे मिळवले, इंग्लंडला गेले, आर्किटेक्ट झाले, टाऊन प्लॅनिंगची पदवी घेतली.

आणि या सगळ्यांमध्ये जो नुसता अभ्यास करत बसला होता, त्याचं नाव शरद पवार!

आईने एकच गोष्ट केली — सगळ्यांना शिकवलं आणि सांगितलं : ज्या धंद्यात आहात त्यात लक्ष केंद्रित करा, धंदा प्रामाणिकपणे करा आणि यशस्वी व्हा. माझ्यापेक्षा धाकटे पेपर उद्योगात गेले; आज ‘सकाळ’चे ते अध्यक्ष आहेत. या भावंडांपैकी आप्पासाहेब पवार आणि प्रताप पवार यांना पद्मश्री, मला पद्मविभूषण. एका मातेच्या तीन पुत्रांना पद्म पुरस्कार या देशात दुसऱ्या कुणालाही मिळालेला नाही. याचं मुख्य कारण आईचे संस्कार.

म्हणून घरातल्या स्त्रीला प्रोत्साहन द्या, अधिकार द्या, तिच्यामार्फत जे करता येईल ते करा — तुमचं घर दुरुस्त होईल. मी मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा महिला धोरण आणलं; नवऱ्याच्या मालमत्तेत पत्नीलाही वारसा मिळाला पाहिजे हा निर्णय घेतला. कर्तृत्वाचा मक्ता पुरुषांकडेच आहे, हे डोक्यातून काढून टाका.

जो जास्त जाणतो, त्याच्याकडून शिकण्यात कमीपणा नाही

आज AI बद्दल आपण ऐकत होतो. देशातली पहिली AI इन्स्टिट्यूट बारामतीला उभी आहे. या तंत्रज्ञानातून शेतीही करता येते, हेक्टरी उत्पादन वाढतं, उद्योगधंद्यातही फरक पडतो. ही नवी टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे. आणि ज्याला आपल्यापेक्षा जास्त समजतं, त्याच्याकडून समजून घेण्यात कधीही कमीपणा मानू नका.

मी कृषिमंत्री झालो, शपथ घेतली आणि महाराष्ट्र सदनावर आलो. सेक्रेटरी एक फाईल घेऊन आले. विचारलं, “कसली फाईल?” म्हणाले, “देशात सहा आठवडे पुरेल एवढंच धान्य आहे. अमेरिकेतून धान्य आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही.” नाइलाजाने मी सही केली. त्या रात्री मला झोप आली नाही. स्वतःला शेतीप्रधान देश म्हणायचं आणि धान्य अमेरिकेतून आणायचं — हे योग्य नाही.

लक्ष तिथे केंद्रित केलं. आणि मी कृषिमंत्रिपद सोडलं तेव्हा गहू, तेलबिया, फलोत्पादन आणि साखर या सगळ्या क्षेत्रांत भारत जगातल्या आघाडीच्या उत्पादक देशांत होता. भारत आयातदार नव्हे, निर्यातदार देश झाला होता. हे चित्र आम्ही बनवून दाखवलं — म्हणजे ते या देशात होऊ शकतं.

मी संरक्षणमंत्री झालो तेव्हा मला लष्करातल्या रँकसुद्धा माहीत नव्हत्या — कर्नल मोठा की ब्रिगेडिअर, हे ठाऊक नव्हतं. काय केलं? शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी पुण्यावरून थेट कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला का? लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात — शंकरराव पांडुरंग पाटील थोरात — हे या देशाचे सरसेनापती व्हायचे होते, पण राजकारणामुळे होऊ शकले नाहीत. संरक्षण खात्यात अत्यंत मोठं काम करणारे ते अधिकारी होते. देशाचा संरक्षणमंत्री एका माजी अधिकाऱ्याकडे जातो, कागद-पेन्सिल घेऊन बसतो आणि ज्याला इंग्रजीत ‘थ्रेट पर्सेप्शन’ म्हणतात ते समजून घेतो — थोरातांची दोन दिवस शिकवणी मी घेतली.

मी असा विचार केला नाही की मी डिफेन्स मिनिस्टर आहे, किंवा हा माझ्या खात्यातला कर्मचारी होता. तो जाणकार आहे, त्याला माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान अधिक आहे — एवढंच पुरेसं होतं.

शेवटी

पक्का निर्णय घ्या — मला याच रस्त्याने जायचं आहे. त्या रस्त्यात कितीही अडथळे आले तरी कष्टाने, मेहनतीने, प्रामाणिकपणाने त्यांवर मात करून मी यशस्वी होणार, ही भूमिका ठेवा. चढ-उतार येतील, पण यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही एक्स्पो भरवला, त्यात यश आलं, नवी माणसं तयार व्हायला लागली आहेत. ५, ६ आणि ७ मार्च २०२७ रोजी तुम्ही पुन्हा हा एक्स्पो करणार आहात — त्यात शंभर टक्के यश येईल याची मला खात्री आहे. या रस्त्याने जा, आम्हा सगळ्यांची साथ असेल. कष्टाला कमी पडू नका. जो ज्ञानी आहे त्याच्याशी सुसंवाद ठेवा. डायलॉग अत्यंत उपयोगी असतो. संवाद ठेवा, समजून घ्या — तुम्ही यशस्वी व्हाल. त्या यशासाठी माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा!


(शब्दांकन : विजय गायकवाड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *