दोन आवाज. एक सत्य.
हजारो वर्षांच्या तहानेचा अनुत्तरित प्रश्न.
✦
“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.”— भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाड, २० मार्च १९२७
लेख १ · वैयक्तिक चिंतन
महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला. त्यानंतर हा दिवस समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो.
या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्यासोबतच अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत उतरले होते.
९७ वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेने नेमकं काय झालं? माझ्यासारख्या दुष्काळी भागातून आलेल्या माणसाला जर विचाराल? पाणी काय असतं ते वेगळं सांगायची गरज नाही. पाण्याचं आजही अप्रुप आहे.
निसर्गचक्रामुळे अलीकडच्या काळात आमचा दुष्काळ संपला आहे. वडिलांच्या भगीरथ प्रयत्नामुळे दुष्काळातही सध्या विहिरीचं पाणी बारा महिने जातं. फार नाही — पाच वर्षांपूर्वी दुष्काळामुळे शेतात जनावरांची छावणी उभारली होती. पाण्याचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेस श्रवण गायकवाड बाबांनी विहीर छावणीसाठी उघडी करून दिली होती.
आमचा दुष्काळ संपलाय पण गावाचा दुष्काळ अजूनही संपलेला नाही. त्यामुळे शेतापासूनच जवळ असलेल्या माळरानावर अहमदनगर जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचं महाविद्यालय सुरू झालं. महाविद्यालय सुरू झालं खरं परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम होता. गावातली शहाणी माणसं गळ घालत होती. परंतु दुष्काळाचे चटके बसलेल्या माझ्या मनाची सहमती पटकन होत नव्हती. अखेर वडिलांची इच्छाशक्ती कामाला आली — २HP पाईपलाईन शेतातील विहिरीवरून महाविद्यालयासाठी देण्यात आली.
“ज्या समाजाला हजारो वर्ष पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं
तो समाज पाणी वाटतोय…”
बाबा ६ डिसेंबरला मुंबईला आले होते, आम्ही शिवाजी पार्कला होतो. एका स्टॉलवर मोफत पाणी वाटत होतं. मला फार कौतुक वाटलं — ज्या समाजाला हजारो वर्ष पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं तो समाज पाणी वाटतोय.
खरंतर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. या पृथ्वीतलावर असलेल्या प्रत्येक किडी, मुंगी आणि प्राणिमात्राचा त्यावर अधिकार आहे.
महात्मा फुलेंनी किती उदार अंत:करणाने त्यांचा १८६८ मधला घरचा हौद अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी खुला केला असेल.
आजही विषमता असलेलं पाण्याचं राजकारण आणि बाजार खुल्या पद्धतीने सुरू आहे.
२० मार्च १९२७ रोजी हजारो वर्षांच्या तहानेची व्याकुळता क्षणात भीमानं संपवली…
वैयक्तिक प्रश्न
माझ्या बापाने केलं — मी काय करतोय?
लेख २ · ऐतिहासिक निबंध
चवदार तळ्याचा खिजगणतीतला इतिहास
राहुल बनसोडे · नाशिक ·
समाजातल्या वरच्या वर्गाने खालच्या वर्गाला वर्चस्वात ठेवण्यासाठी त्यांच्या अन्न आणि पाणी ह्या दोन जीवनावश्यक घटकांवर नियंत्रण ठेवण्याच्या उदाहरणांनी अवघा मानव इतिहास बरबटलेला आहे. ह्या दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास खालच्या वर्गाच्या जगण्यासाठीच्या हतबलतेचा वापर करून मोठमोठी साम्राज्ये निर्माण करता आली.
कधीकाळच्या ह्या उत्तुंग साम्राज्यांच्या खाणाखुणा मागे राहिलेल्या त्यांच्या बांधकामात दिसून येतात, त्या बांधकामाच्या तळाशी असलेले शोषितांचे अश्रू वा त्यांचा हिशेब कुणाच्या खिजगणतीतही नसतो. खिजगणती म्हणजे खोटे नव्हे तर लपवून ठेवलेले सत्य — एक असे सत्य जे माहित असणारा माणूसही स्वतःच स्वतः आठवू इच्छित नाही.
नदी आणि तळे
महाड गावाजवळून सावित्री नदी वाहते. पुराणातल्या एखाद्या महान स्त्रीचे नाव नदीला दिले म्हणजे मग आपसुकच तिला पावित्र्याच्या नावाखाली नियंत्रणात ठेवता येते. भारतात ज्या ज्या नद्यांची नावे अशी पुराणातल्या पवित्र स्त्रियांच्या नावाने ठेवली गेली आहेत त्या त्या नद्यांच्या गावाजवळचा इतिहास तपासून पाहिला तर त्यांनी अस्पृश्यतेचे — अधिक योग्य शब्दांत, मूलभूत मानवी अधिकारांच्या पायमल्लीचे — ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दिसतात.
सावित्री महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावल्यानंतर साठेक मैलांच्या प्रवासात असंख्य वळणे घेते. पावसाळ्यात प्रचंड पूर, उन्हाळ्यात कोरडी — इतकी कोरडी की हीच ती सावित्री का? असा प्रश्न पडावा.
सावित्रीच्या प्रवाहापासून मैल दीड मैलावर असलेल्या चवदार तळ्यात एक झरा जमिनीखालून पोहचायचा. निसर्गाने भेदभाव न करता उपलब्ध करून दिलेले पाणी. त्या जलाशयाचे पाणी पित पित प्राचीन नदीकाठची संस्कृती तिथे आकार घेत राहिली. शोषणाची व्यवस्था जिथे शंभरेक वर्षांपेक्षा जास्त काळ तग धरून राहते त्या भागाचा ‘विकास’ होतो. महाडच्या तळ्याचेही तेच झाले — चहुबाजूंनी तटबंदी, चारी बाजूंनी दारे. निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेले पाणी चौकटीत बंद झाले, त्याचे ‘चवदार’ तळे झाले.
तहानेची तर्कसंगती
चहुबाजूंनी दारे बंद असलेले हे तळे ‘राखणाऱ्यांच्या’ दृष्टीने अभिमानाची गोष्ट होते. महाडमध्ये कधीही पाण्याची ददात नसते, पाण्यावर अस्पृश्यांची सावलीही पडत नाही म्हणून ते स्वच्छ आणि गोड असते — अशा कथा कोकणात सांगितल्या जात. ह्या तळ्याचे पाणी पिण्याची परवानगी तर अस्पृश्यांना नव्हतीच पण त्या तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही ते कधी चालत नसत.
त्या काळच्या गावरचनेप्रमाणे पश्चिमेकडे थोडे चालत गेल्यास सावित्रीचा प्रवाह लागत असे — अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीची ठिकाणे होती. प्रश्न तेव्हा सुरू व्हायचा जेव्हा सावित्री आटायला लागायची. उन्हाळ्यात नदी जवळपास संपायची आणि उरलेले डोह जातीच्या उतरंडीनुसार वाटले जायचे. खालच्या वर्गातल्या लोकांना आपल्याजवळ असलेली एकमेव तांब्याची वा पितळेची कळशी वापरावी लागे, कित्येकांकडे तीही नसायची. संस्कृतीसाठी धातुयुग सुरू होऊन हजारो वर्षे झालेली असली तरी ह्या धातुसंस्कृतीतला किमान वाटाही ह्या लोकांना मिळालेला नव्हता.
“पाण्यासाठी एखादा जीव इतका लाचार करणे ही
इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी.”
कुटुंबातली दोन-तीन लहान मुले आणि स्त्रिया लांब डोहावरून पाणी आणण्याच्या कामातच गर्क असत. ते पाणी आणायला जात असताना पलिकडच्या रस्त्यावर एक तळे आहे — बारमाही पाणी असलेले — हे माहित होते. पण ते पाणी आपल्या नशिबातच नाही, त्यावर आपला कुठलाही हक्क नाही हा अजाणतेपणाने माहित असलेला नियम त्यांच्या अंगवळणी पडलेला होता. शिक्षा इतक्या अमानुष असत की त्या तळ्याच्या पाण्याचा मोह पडण्यापेक्षा अस्पृश्यांना त्याची भीतीच जास्त वाटत असावी.
वैशाखाच्या शेवटी नदीचा तळ उकरून झिरे उपसले जात आणि त्यात जमा होणारे थेंब थेंब पाणी वाटीने किंवा खापराने भांड्यात जमा करून घरी नेले जाई. तहान इतकी प्रखर असे की ते पाणी निवळून स्वच्छ व्हायची वाट पाहण्यापर्यंत वेळ नसायचा. पाण्यासाठी एखादा जीव इतका लाचार करणे ही इथल्या उदात्त संस्कृतीची सर्वात मोठी देणगी असावी.
कायदा आणि सत्याग्रह
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश प्रशासनाच्या सोयीसाठी भारताची कायदेव्यवस्था अधिकाधिक बळकट होत होती. भारतातला जातीवाद अंतिमतः ब्रिटिशांच्या उत्पादनावर परिणाम करत असल्याने १९२३ साली तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने अस्पृश्यांना सार्वजनिक संसाधनांचा वापर करू देण्याची कायद्याने परवानगी दिली.
ह्या काळात महाड एक महत्त्वाची नगरपरिषद म्हणून विकसित होत होते. दासगाव बंदरात मालाची वाहतूक चालायची, सैन्याची ये-जा असायची. इतके सामाजिक परिवर्तन घडत असूनही ह्या लोकांना महाडच्या बाजारात पिण्याचे पाणी मिळत नसे, तळ्यावरही प्रवेश नव्हता.
१९२३ च्या कायद्याचा आधार घेऊन महाड नगरपरिषदेचे अध्यक्ष सुरबानाना टिपणीस ह्यांनी चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले होते — परंतु उच्चवर्णियांचा तीव्र विरोध आणि पहारा यामुळे प्रत्यक्षात पाणी पिणे शक्य नव्हते. टिपणीसांचे तरुण मित्र रामचंद्र बाबाजी मोरे ह्यावर तोडगा शोधत होते. १९२४ च्या कुलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन परिस्थिती कथन केली. सत्याग्रह हाच एकमेव मार्ग असल्याची सर्वांची खात्री पटली.
चार वर्षांच्या विचारमंथन आणि पूर्वतयारीनंतर १९२७ साली आंबेडकरांनी अधिकृत घोषणा केली. सत्याग्रहात जी.एन. सहस्त्रबुद्धे (चित्पावन ब्राह्मण समाजसुधारक), ए.व्ही. चित्रे (कायस्थ प्रभू समाजसुधारक), आणि सुरबानाना टिपणीस थेट सहभागी होते — परंतु पाणी पिण्याचे मूलभूत कार्य अस्पृश्यांनाच करावे लागणार होते.
२० मार्च १९२७ रोजी सार्वजनिक सभा झाली. टिपणीसांनी सर्व सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केल्याचे जाहीर केले. आंबेडकरांनी सभेचे नेतृत्व करून चवदार तळ्याकडे पायी चालण्यास सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ तीन हजार अस्पृश्य — काही मुस्लीमही — चालू लागले. चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरत आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते पाणी सावकाश प्यायले.
त्या पायऱ्या
चवदार तळ्याच्या उजव्या बाजूच्या पायऱ्यांचे बांधकाम आता थोडे बदललेले असले तरी त्या पायऱ्या उतरून खाली तळ्याकडे जाताना सद्भावना असलेला कुठलाही माणूस शहारतो. महाड गावची स्थानिक हवा त्या पायऱ्यांच्या आडोशाच्या भागात एक विशिष्ट वातावरण तयार करते.
ह्या जागेला इतिहास नसता तरी तळ्याच्या पायऱ्या उतरून पाण्याला पहिला स्पर्श करण्याची अनुभूती मानवी भावनांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी विशेषच राहिली असती. त्या पायऱ्यांना जगातल्या अत्यंत मूलभूत संघर्षाची जोड मिळाल्याने त्यांच्यावरून उतरून खाली जाताना येणारा अनुभव हा अनेकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अनुभव आहे.
“त्या शहाऱ्याचे दुसरे नाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे.”
ह्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या वर्गातल्या पूर्वास्पृश्य लोकांना ह्या पायऱ्या उतरताना आजही अंगावर शहारा येतो. ह्या शहाऱ्याचे दुसरे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. आंबेडकरांनी फक्त नवा इतिहासच नाही तर नवा भूगोलही घडवला — आणि हा इतिहास-भूगोल इत्यंभूत माहिती करून घेणाऱ्यांसाठी त्या शहाऱ्यातून नव्या युगाच्या माणसाची स्वतंत्र मानसिकताही घडवली.
नवे चवदार तळे
आंबेडकरांनी सुरू केलेला पाण्याचा संघर्ष आज एका नव्या टप्प्यात आहे. फक्त श्रीमंतांना परवडणारे बाटलीबंद पाणी हे नवे चवदार तळे आहे. सावित्रीसह भारतातल्या इतर सर्व नद्यांचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले असून त्यांतल्या कोणत्याही नदीचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही.
भारतातले अनेक झरे कायमस्वरूपी आटत चालले असून तळ्यांची संख्या कमी होत आहे, तळी दूषित होत आहेत, काही ठिकाणी ती पूर्णतः कोरडी पडली आहे. केमिकल्स आणि सांडपाण्याने दूषित झालेले पाणी आजही कोट्यावधी लोकांना प्यावे लागत आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक लोकांना चवदार तळ्याच्या सत्याग्रहापूर्वीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठीचा मूलभूत संघर्ष पुन्हा करण्याची नितांत गरज असूनही आता आपल्याकडे कॉ. रामचंद्र मोरे, सुरबानाना टिपणीस, जी.एन. सहस्त्रबुद्धे किंवा भाई चित्रे नाहीत.
अंतिम वाक्य
‘पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी’ जगातला पहिला संघर्ष करणारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे नाहीत.
जय भीम · जय संविधान · जय किसान 🙏
समता दिन, २० मार्च निमित्त प्रकाशित ·
#समतादिन#SamataDin#चवदारतळे#ChavdarLake#महाडसत्याग्रह#डॉआंबेडकर#जयभीम#जयसंविधान#पाण्याचाहक्क#KrishiParva

