vijay gaikwad llb glc

90 वर्षांपूर्वी ‘जीएलसी’चे प्रिन्सिपल ते 2025 माझी जीएलसी मधील कायद्याची पदवी..

90 वर्षांपूर्वी ‘जीएलसी’चे प्रिन्सिपल ते 2025 माझी जीएलसी मधील कायद्याची पदवी..

१ जून १९३५ रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर यांना मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली होती. या घटनेला नुकतेच 90 वर्ष पूर्ण झाले. मी देखील याच वर्षी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून 11 जून 2025 रोजी कायद्याची पदवी घेऊन बाहेर पडलो.

माझा कायद्याचा शिक्षणाचा प्रवास रोमांचक आहे. त्यासाठी सोळा-सतरा वर्ष मागे वळून पहावं लागेल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे कृषी महाविद्यालयातून बीएससी ऍग्री ची पदवी घेऊन मी डिसेंबर 2006 मध्ये पुण्यातून मुंबईत नोकरीच्या निमित्ताने शिफ्ट झालो झालो.

नोकरी लागली. पगार सुरू झाला. याच दरम्यान मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. वडील श्रावण गायकवाड Shrawan Gaikawad यांची लेबर कोर्टातील केस हायकोर्टातून रीइनस्टेट केली होती. दरम्यान जशी तारीख पडेल तसं ठाण्याच्या लेबर कोर्टात जाऊन हजेरी देत होतो. माझ्या सुरुवातीच्या अल्प उत्पन्नातही प्रत्येक सुनावणीला वकील अडीच तीन हजार रुपये मागायचा. त्यातूनच पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण घ्यायचे हे नक्की झाले होते. 2008-09 वर्षासाठी मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीपासून हे नक्की माहीत होतं. दोन वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल होते. त्यामुळे काही झाले तरी उच्च गुणवत्तेसह या महाविद्यालयातून पदवी मिळवायची हा मनोमन संकल्प होता. सकाळ- ॲग्रोवनची नोकरी आणि मला पहाटे उठून सकाळी सात वाजता पहिले लेक्चर अटेंड करणे असा दिनक्रम सुरू झाला. टेक्नॉलॉजी फारसी नव्हती त्यामुळे सगळेच मॅन्युअली करावे लागत होते. डॉ. अनंत कळसे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव होते ते शासकीय विधि महाविद्यालयात ‘Constitution’ शिकवायचे.

पहिल्या वर्षाचे दोन्ही सेमिस्टर पूर्ण केल्या. 2010 मध्ये दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊन तिसरे सेमिस्टर देखील पूर्ण केले. दरम्यानच्या काळात मुंबईतील भाड्याच्या घरातून स्वमालकीच्या घरामधला प्रवेश त्याचबरोबर 2011 मध्ये लग्न. ऑफिसचा कामाचा लोड आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यातून अभ्यासाला वेळ मिळत नव्हता .या सगळ्याचा कॉलेजच्या निकालावर परिणाम होत होता ते मला मान्य नव्हते.संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे या वर्षांमध्ये नकळत एलएलबी शिक्षणाच्या प्रवासाला तिसऱ्या सत्रामध्येच स्वल्पविराम मिळाला.

आयुष्याच्या राहडगड्यात इतका अडकलो की आता परत राहिलेले शिक्षण पूर्ण होईल की नाही ही शंका वाटत होती. सौभाग्यवती आश्लेषा Ashlesha Sonawane यांचा पाठपुरावा मात्र कायम सुरू होता की तुम्ही कायद्याचे शिक्षण पूर्ण करून घ्या. मध्यंतरी 2017 मध्ये बंधू डॉ.गिरीश गायकवाड यांनी देखील एलएलबी ला ऍडमिशन घेतले. माझ्याच्याने होणार नाही म्हणून माझ्या सगळ्या नोट्स आणि पुस्तके मी डॉ. गिरीश Girish Gaikwad यांना देऊन टाकली. डॉक्टर देखील सांगत होते की एकदा कॉलेजमध्ये जाऊन ये. कोविड संकटामध्ये अनेकांनी ऑनलाईन परीक्षा देऊन कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. तसे काही मला करता येईल का? इतक्या वर्षानंतर आणि गॅप नंतर होईल का? हा माझ्या मनामध्ये प्रश्न होता.

वर्षा पाठोपाठ वर्ष निघून जात होते. एकंदरीतच मी करत असलेल्या पत्रकारिता आणि पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कोविड नंतर दोलायमान परिस्थिती तयार झाली होती. पुन्हा एकदा कायद्याचा अभ्यास करण्याची उर्मी दाटून आली होती. जवळपास पंधरा-सोळा वर्षानंतर विधी शिक्षणाचे सगळे संदर्भ बदलले होते. एका कोर्ट केसच्या निमित्ताने कायद्याचा जवळून संबंध आला होता. विधी शिक्षण प्रवेशासाठी आता सीईटी परीक्षा देणे बंधनकारक होतं. मी 2023 ची सीईटी दिली आणि चांगल्या मार्काने पास देखील झालो.
मुंबईत घराच्या जवळ काही चांगली कॉलेज मिळतात का हे पडताळून पाहत होतो. खाजगी महाविद्यालयांचा दरम्यानच्या काळात भरपूर वाईट अनुभव आला. शेवटी एक प्रयत्न शासकीय महाविद्यालयात जाऊन चौकशी करायचे असे ठरले. सगळी जुने कागदपत्र जमा केली सगळ्या मार्कशीट एकत्र करून जीएलसी पुन्हा गाठले. जवळपास पंधरा वर्षानंतर या इमारतीत पुन्हा प्रवेश केला होता. सगळे बदलले होते. प्रशासकीय विभागात भेटून मी माझी कागदपत्रे आणि केस सांगितली. कॉलेजमधून एक प्रतिज्ञापत्र आणि अर्ज करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार मी सर्व कागदपत्रे जमा केली. मुंबई विद्यापीठाचे परिपत्रक Circular क्र.युजी/आय.सी.डी/२०१६/२७४ of University of Mumbai Dated 14 October. 2016 नुसार ज्या ठिकाणी मी कायद्याचं शिक्षण थांबवलं होते त्या ठिकाणापासून पुढे कायद्याचे शिक्षण घेण्याची परवानगी मिळाली.

ऑक्टोबर 2023 मध्ये तिसऱ्या सत्राचे ‘कंपनी लॉ’आणि ‘ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ’ या दोन विषयांच्या परीक्षा दिल्या. चौथ्या सेमिस्टर च्या परीक्षा एप्रिल 2024 मध्ये दिल्या. जून 2024 मध्ये एलएलबी च्या शेवटच्या वर्षाला प्रवेश घेतला. मुलांनी कोर्टात पीटीशन दाखल केल्यामुळे बायोमेट्रिक अटेंडन्स, 75 टक्के उपस्थिती, कडक इंटरनल चे नियम अस्तित्वात आले होते. दरम्यान पंधरा ते वीस वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा प्रवेश घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक चांगला ग्रुप तयार झाला.

https://youtube.com/watch?v=oX6bwVoV_4s%3Fsi%3DV104OXxHtff4GPEw

सहकारी तत्त्वावर आम्ही एकमेकांना 100% मदत करण्याचे ठरवले आणि ते प्रत्यक्ष कृतीत देखील आणले. कुठल्याही परिस्थितीत एलएलबी पूर्ण करायचेच हे सर्वांनी सर्वानुमते ठरवले. शेवटच्या वर्षाचे पाचवे आणि सहावे सेमिस्टर रेगुलर मुलांसोबत केले. त्यामुळे आमची बॅच ‘मिक्स पॅटर्नची’ बॅच होती. म्हणजे पहिले वर्ष आम्ही जुन्या पॅटर्न प्रमाणे सगळे पेपर 100 मार्काचे दिले होते. दुसऱ्या वर्षी आम्ही 60:40 अशा फॉर्मेटमध्ये परीक्षा दिल्या. शेवटच्या वर्षाला नियमित विद्यार्थ्यांसोबत 75:25 पॅटर्ननुसार परीक्षा दिल्या.

यावेळी परीक्षेसाठी मी माझा स्वतःचा पॅटर्न तयार केला. इंग्रजीमध्ये अभ्यास करायचा आणि मराठी मध्ये उत्तर लिहायची. त्यामुळे स्कोर चांगलाच वाढत होता. विशेष म्हणजे विषयाचे ज्ञान आणि समज अधिक चांगली होत होती. शेवटच्या वर्षात नवे कामगार कायदे (Labour code 2020), आंतरराष्ट्रीय कायदे (International laws), भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS), दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC-1908) या सगळ्या विषयांमधून एक नवीन कायद्याची दृष्टी मिळाली.
शेवटच्या सहाव्या सत्रात देखील भारतीय साक्ष अधिनियम ( BSA-2023), कर कायदा ( Taxation), बौद्धिक संपदा कायदे ( IPR), बँकिंग आणि NI act हे विषय देखील फार व्यवस्थित समजून घेता आले.

एप्रिल 2025 मध्ये फायनल परीक्षा झाल्या. 11 जूनला निकाल लागला. फर्स्ट क्लास म्हणजेच पहिल्या वर्गात LL.B पूर्ण झाले होते.

1 जून 1935 ला राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले होते. 90 वर्षे या घटनेला पूर्ण होताना याच महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेताना मला मनस्वी आनंद होत आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक माध्यमिक शिक्षण. पुण्यासारख्या विद्यानगरीमध्ये उच्च शिक्षण आणि मुंबईत पत्रकारितेचे वीस वर्ष करियर आणि आता कायद्याच्या शिक्षणातून एका नव्या वळणावर येऊन पोहोचलो आहे.
ठरल्याप्रमाणे उर्वरित आयुष्य हे शेती आणि संविधानाला समर्पित केले आहे.
त्यामुळेच मी नेहमी जय किसान आणि जय संविधान चा नारा देत असतो. कायद्याच्या शिक्षणासाठी कळत- नकळत मदत करणारे प्रोत्साहन देणाऱ्यांच्या ऋणातच राहणे पसंत करेल.

जय किसान जय संविधान
विजय गायकवाड
मुंबई
12 जून 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *