डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि कृषिनितीचे अभ्यासक होते. त्यांनी भारतीय शेतीव्यवस्थेतील अडचणींचा सखोल अभ्यास करून कृषी विकासाची दिशा स्पष्ट केली. त्यांच्या मते, शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु परंपरागत आणि असमान व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना पुरेशा संधी मिळत नाहीत. म्हणूनच त्यांनी जमीन सुधारणा, सहकारी शेती, जलसंधारण, कृषी वित्त आणि सामाजिक न्याय यासारख्या विषयांवर मोलाचे विचार मांडले.
१. जमीन सुधारणा आणि शेतकऱ्यांचे हक्क
बाबासाहेबांनी भूसंपत्तीच्या असमान वाटणीविषयी आवाज उठवला. त्यांच्या मते, जमीनदारी आणि जहागिरी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे शोषण झाले. त्यामुळे, “शेतकरी हा भूमिहीन असू नये,” असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क मिळावेत यासाठी कायदे करण्याची गरज सांगितली. त्यांनी जमीनसुधार कायदे, भूधारणा मर्यादा, आणि जमिनींचे पुनर्वाटप यासारख्या उपाययोजनांचे समर्थन केले.
२. सहकारी शेती आणि औद्योगिकीकरण
भारतीय शेती लहान तुकड्यांमध्ये विभागली गेल्यामुळे उत्पादनक्षमतेत मोठी घट झाली. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी सहकारी शेतीचा आग्रह धरला. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती केली, तर त्यांना आधुनिक साधनांचा वापर करता येईल आणि उत्पादन वाढेल.
त्यांनी कृषी क्षेत्राच्या औद्योगिकीकरणावर भर दिला. शेतीशी निगडित प्रक्रिया उद्योग उभारले, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि बेरोजगारी कमी होऊ शकते. त्यासाठी सिंचन यंत्रणा, खते आणि तांत्रिक साधनांचा वापर गरजेचा आहे, असे त्यांचे मत होते.
३. पाणी व्यवस्थापन आणि सिंचन
बाबासाहेबांनी जलसंपत्तीच्या योग्य व्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी धरणे, कालवे आणि विहिरींच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज सांगितली. त्यांनी ‘सेंट्रल वॉटर कमिशन’सारख्या संस्थांची स्थापना करण्यास महत्त्व दिले. त्यांनी “Dams are the temples of modern India” असे प्रतिपादन केले होते. धरणे, कालवे आणि विहिरींच्या माध्यमातून शेतीसाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शाश्वत शेती साध्य करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी भारतातील नद्यांचे एकत्रित व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प आणि पर्जन्य जलसंचय योजना यांचे समर्थन केले. त्यांचा विश्वास होता की, जर जलव्यवस्थापन योग्य पद्धतीने केले गेले, तर दुष्काळग्रस्त भागांमध्येही शेतीत सुधारणा होऊ शकते.
४. कृषी वित्त आणि आर्थिक मदत
शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचक कर्जांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी पतसंस्था, सहकारी बँका आणि सरकारी अनुदान योजनांचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, सरकारी बँकांनी शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदराने कर्ज द्यावे, जेणेकरून त्यांचे आर्थिक शोषण टळेल.
त्यांनी सरकारकडून कृषी सवलती, अनुदान योजना आणि कृषी बँकिंग सुधारणा यांचा आग्रह धरला. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासाठी आर्थिक मदत मिळावी आणि पीक विमा योजना लागू करावी, असे त्यांनी सुचवले.
५. जातिव्यवस्था आणि कृषी
बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीतील जातीय शोषणावर तीव्र टीका केली. त्यांच्या मते, शेतीमध्ये जातीय भेदभावामुळे मागासवर्गीय आणि दलित समाजाचे शोषण होते, त्यामुळे त्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे.
त्यांनी भूमिहीन आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी विशेष जमिनींचे वाटप करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, कृषी क्षेत्रात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सरकारने ठोस धोरणे आखली पाहिजेत.
६. कृषी उत्पन्न आणि बाजारपेठ
बाबासाहेबांनी कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी वैज्ञानिक शेतीचा आग्रह धरला. त्यांनी शेतीमाल साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ सुधारणा यावर भर दिला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करावी, असे ते मानत.
त्यांनी कृषीमाल निर्यात धोरण, थेट शेतकरी ते ग्राहक विपणन आणि शेतकरी बाजार (Farmer Markets) उभारणीचे समर्थन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती आणि कृषी अर्थव्यवस्थेवर काही महत्त्वाचे लेखन केले आहे. त्यामध्ये Small Holdings in India and Their Remedies (1918) – या पुस्तकात त्यांनी भारतातील लहान शेतजमिनींच्या समस्यांवर आणि त्यावरील उपायांवर चर्चा केली आहे. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution (1923) – यामध्ये कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या चलनविषयक मुद्द्यांचे विश्लेषण आहे. State and Minorities (1947) – या ग्रंथात त्यांनी शेतकरी आणि दलित वर्गाच्या आर्थिक हक्कांविषयी चर्चा केली आहे. Philosophy of Hinduism – यात शेती आणि आर्थिक धोरणांवर त्यांनी मांडलेले विचार आहेत.
त्यांच्या धोरणांचा योग्य अवलंब केल्यास भारतीय शेतीव्यवस्था अधिक सक्षम आणि शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो. त्यांच्या विचारांवर आधारित कृषी धोरणे अमलात आणल्यास भारताची शेती अधिक शाश्वत, समृद्ध आणि उत्पादक होऊ शकते.
स्वप्न बाबासाहेबांचे शाश्वत शेतीचे
शेतकरी राजा, जनतेचा आधार,
बाबासाहेबांनी मांडला शेतीचा विचार।
भूमिहीनांना हक्काची दिली साद ,
समानता-स्वातंत्र्याची पेटवली आग।
भूमिसुधाराच्या उठवल्या मोहिमा,
शेतकऱ्यांच्या आयुष्यातील तो हाच करीष्मा ।
जातीय अडथळ्यांचे तोडूनीया बंध,
शेतीला दिला विकासाचा नवा गंध ।
सिंचन-जलसंधारणाला दिले महत्त्व,
आधुनिक गट शेती व्हावी, हेच शेतीचे तत्त्व।
सहकारी चळवळीने सोडवले प्रश्न,
नवे तंत्रज्ञान, प्रगत शेती हाच शेतीचा मुलमंत्र।
शेतीमाल मिळावा योग्य भाव,
तरच शेतकऱ्यांचा लागेल ठाव।
संविधानसारखे स्वप्न घेतील उंच भरारी,
बाबासाहेबांचे विचारानी शेती शाश्वत होईल सारी।\
संकलन व लेखन-
श्री मंगेश किसन भास्कर.M.Sc. Agri – Horticulture
संस्थापक, शाश्वत फार्मिंग फाउंडेशन, पुणे
श्री शिवाजी अर्जुन कांबळे. M.Sc. Agri – Soil Science
व्याख्याता, सुभाष विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, पिंपळवंडी ता जुन्नर पुणे
9404244094 email- shivaji4@rediffmail.com

