समाजात नेमके आदर्श कोण ? या प्रश्नाचा मागोवा घेत मर्मभेदी सामाजिक वास्तवाचे विश्लेषण केलं आहे जीएसटी आणि विक्रीकर उपायुक्त ललिता जगताप यांनी….
आजच्या काळात आदर्श घेण्यासारखे कोणी उरलेले नाही, हे वाक्य आजूबाजूला कानावर पडत असते. पण, खरंच असं आहे का? सद्यपरिस्थितीचा धांडोळा घेतला तर जाणवेल की आदर्श घेणं म्हणजे काय हेच कुणाला समजतंय की नाही अशी परिस्थिती आहे. आदर्श घेणे म्हणजे व्यक्तिमहात्म्य वाढवणे किंवा व्यक्तिपूजा करणे नाही, तर ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो त्या व्यक्तीतील आदर्श गुण आत्मसात करून त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात आचरण करणे. इतकं सोपं आहे. खरंतर आपल्या आसपास देखील असे काहीजण असतात की त्यांना आपण आदर्श मानू शकतो, परंतू तथाकथित सामाजिक मापदंडात त्यांची गणना यशस्वी लोकांत होत नसल्याने आपण जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे आपण एक तर देवामध्ये किंवा यशस्वी माणसातच आदर्श शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आदर्श मानणं नंतर इतकं टोकाला जातं की हे आदर्श आपण अमानवी, असामान्य समजायला लागतो. अशा वेळी आपल्या हे लक्षात येत नाही की, असे करुन त्या आदर्शाचे कार्य आपण नाकारायला सुरुवात करत असतो. नाकारणे म्हणजे, थोडक्यात त्यांची चिकित्सा आपण अमान्य करतो. आपल्या आदर्शाचे माणूसपण नाकारतो. आपण ज्यांना आदर्श मानतोय किंवा महापुरुष मानतोय तेही मनुष्यच होते हे आपण समजून घेत नाही. आणि, त्याच्याही पुढे जाऊन आपण त्यांना देवत्व बहाल करतो आणि त्यांच्यासारखं आचरण करण्याच्या जबाबदारीतून आपली अलगद सुटका करून घेतो. हे बरोबर आहे का? सध्याच्या काळात आपण आपल्या आदर्शावरून मग ते धर्माचे असो, जातीचे असो, राष्ट्राचे असो, अगदी गाव कसबा किंवा घरातले असो आपण एकमेकांशी या आदर्शवादाच्या श्रेष्ठत्वासाठी भांडत बसलेलो आहोत आणि परिणामी समाजाची वीण उसवत आहोत.

भारतीय समाजाची सध्याची अवस्था बघता आजचे चित्र फारच विदारक आहे. धर्म, जात, पंथ, देश, राज्य या सगळ्या अस्मिता अत्यंत टोकदार झालेल्या आहेत. याचा परिणाम म्हणून संपूर्ण समाज आणि परिणामतः प्रत्येक व्यक्ती असुरक्षित झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम संपूर्ण देशावर व देशाच्या प्रगतीवर विपरीत पणे होताना दिसत आहे. या परिस्थितीचा सखोल विचार केला असता असं जाणवतं की आत्ता जी पिढी पालकत्व निभावत आहे तिने अत्यंत सजग पद्धतीने आपल्या मुलांचे वैचारिक संगोपन करणे आवश्यक आहे. जर पालकांनी त्यांची ‘जबाबदारी’ जबाबदारीने पार पाडली नाही तर समाज माध्यमे त्यांचं काम करतच आहेत. पालकांनी मुलांना कितीही शिक्षित केलं, खूप पदव्या मिळवून दिल्या तरीही मुलं सुजाण होतील याची खात्री नाही. त्यामुळेच मुलांना शिक्षित करण्यासोबतच सुसंस्कृत करण्याचं काम हे पालकांचं मुख्य ध्येय असलं पाहिजे. तरुण पिढीची आत्ताची अवस्था बघता सध्या ती भौतिकतेच्या मागे लागून अत्यंत भरकटलेल्या अवस्थेत आहे. त्यांचं वैचारिक मंथन, प्रबोधन आणि वैचारिक शुद्धीकरण होणं अत्यंत महत्त्वाचे आहे.
आजच्या तरुण पिढीला जर आपण आदर्श व्यक्तींबद्दल व्यवस्थित सांगितले नाही तर त्यांना कधी कळणारच नाही की खरे आदर्श कोण असतात आणि कसे असतात. सध्या ज्या पद्धतीने इलेक्ट्रोनिक माध्यमे व समाजमाध्यमांद्वारे आदर्शांची मांडणी केली जाते ते खरोखरच भयानक आहे. डॉन गिरी करणारे गुंड, पाखंड पसरवणारे काही भोंदू बाबा, चाटुगिरी करणारे काही कलाकार, कोणतीही भूमिका नसणारे काही तथाकथित साहित्यिक-कवी, कोणतीही विचारसरणी नसणारे काही राजकारणी, वैयक्तिक लाभासाठी स्वतःची तत्त्व विसरणारे काही विचारवंत अशांची सध्या चलती आहे. यांच्यामागे आपली तरुण पिढी भरकटतच आहे. रणवीर अलाहाबादिया या प्रकरणावरून आपल्याला याची पुरेपूर कल्पना आलेलीच आहे. त्यामुळेच पालकांवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे आत्ताच्या पिढीला समजणे फार आवश्यक आहे. आपल्या समाजात अशी माणसे होऊन गेली आहेत यावर यांचा विश्वास बसू शकत नाही अशी परिस्थिती सध्या आहे. याबाबत आईनस्टाईन यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी जे म्हटले होते त्याची आठवण आली. त्यांचे वक्तव्य होते की, महात्मा गांधी यांच्यासारखा माणूस होऊन गेला हे येणाऱ्या पिढ्यांना खरे वाटणार नाही, त्यांना हे आपल्याला सांगावे लागेल. आता आईनस्टाईनचे हे विधान सत्यात उतरले आहे की काय असं वाटत आहे. गैरवर्तन, बेकायदेशीर वर्तन, अवगुण यांचे सामान्यीकरण झालेलं आहे की काय असं वाटण्याजोगी परिस्थिति आहे. त्यामुळेच पालकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची झालेली आहे.
आपल्या मुलांशी आदर्शांवर बोलण्याआधी आपणच आपले आदर्श आधी ठळक करून घेणे आवश्यक आहे. कारण जगण्याच्या रोजच्या लढाईत आपणच आपले विचार बोथट केलेले आहेत. काही तत्त्वं ही कधीच कॉम्प्रमाईज करायची नसतात हे आधी आपणच आपल्याला ठणकावून सांगणे गरजेचे आहे. थोडं मागं जाऊन आपणच आपल्या विचारांना थोडी धार लावणे गरजेचे आहे. कारण आपल्या विचारांना धार असेल तरच आपल्या आचरणात ते दिसून येईल. जेव्हा आचरणात दिसेल, तेव्हाच मुलं आपला आदर्श घेतील. कारण, मुलं आपण सांगू त्या सूचना पाळत नाहीत, तर ते आपलं निरिक्षण करत असतात, अनुकरण करत असतात. म्हणूनच आपलं वर्तन आदर्श असेल तरच मुलं ते आचरणात आणतील आणि तसे वागतील.
सध्याच्या स्थितीत आदर्शांवरून समाजात जे संघर्ष सुरू आहेत आणि आमचाच आदर्श कसा श्रेष्ठ आहे याच्यावरून जी अहम अहमिका लागलेली आहे त्यामुळे समाजाचा प्रवास पुन्हा उलट्या दिशेने सुरू झाला आहे असं वाटण्यास खास वाव आहे. हा उलट दिशेने जाणारा प्रवास पुन्हा प्रकाशाकडे न्यायचा असेल तर आपल्यालाच झोपेतून तात्काळ जागे होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या पिढीचे भविष्य गिळंकृत करण्यासाठी काळोख आनंदाने प्रतीक्षा करत ‘आ’ वासून उभा आहे. पुढच्या पिढीचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य अंधारात जाऊ न देण्यासाठी आपण आधी स्वतःची वैचारिक बैठक पक्की करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुद्द्याविषयी आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. तसेच त्या भूमिकेविरुद्धचा मतप्रवाह सुद्धा मोठ्या मनाने आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. यातून मुलांना स्वतःची भूमिका घेणे, ती मांडणे आणि विरोधी मतांचा सुद्धा आदर करायचा असतो हे समजेल.
पालकांचे आचरण हेच मुलांसाठी आदर्श असेल तर बाहेरची इतर माध्यमे मुलांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करणार नाहीत. मुलांना तर्काने विचार करायला सांगण्याआधी त्यांना तुमच्या वागण्यात, बोलण्यात तर्कशुद्ध विचरसरणी दिसायला हवी, अन्यथा तुम्ही त्यांना कितीही तर्कशुद्ध विचारांचा दाखला दिला तरी ते तसे वागणार नाहीत. यासाठीच पालकांनी किंबहुना समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या आदर्शांची मांडणी आणि त्या अनुषंगाने आपले विचार आधी घासून पुसून तर्काच्या कसोटीवर लख्ख करुन घेतले पाहिजेत.

आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ,चकाकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं नसते, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रसिद्ध व्यक्ती ही किंवा प्रत्येक यशस्वी व्यक्ती मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो ती आदर्शच असेल असे नाही. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. समाजाने शतकानुशतके जे आदर्श अजूनही टिकवून ठेवले आहेत ते आदर्श आपण आधी समजून घेतले पाहिजेत, तरच ते आदर्श आपण पुढच्या पिढीला सुपूर्द करू शकू. त्यासाठी आपणही थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. सांगोवांगी गोष्टींवर विश्वास ना ठेवता वाचन केले पाहिजे, ज्यांना संशोधन करता येईल त्यांनी ते केले पाहिजे. उपनिषदे, चार्वाक, बुद्ध, महावीर, शंकराचार्य, भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ना. गोखले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुधारक आगरकर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज हे जे आपले शतकानुशतकांचे आदर्श आहेत त्यांना आधी आपण समजून घेतलं पाहिजे तरच ते योग्य पद्धतीने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतील. नाहीतर समाज माध्यमे त्यांना हव्या तशा पद्धतीने किंबहुना विकृत पद्धतीने त्यांना आत्ताच्या पिढीपर्यन्त पोहोचवण्यात यशस्वी होत आहेत, हे सध्याचे भीषण वास्तव आहे. हे टाळण्यासाठी आपला अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. काही लोक हेतुपूरस्पर या महापुरुषांच्या नावाखाली नवीन संघर्ष निर्माण करून समाजात भिंती बांधत आहेत, ही एक प्रकारे या महापुरुषांची अवहेलनाच आहे. आपले महापुरुष हे मनुष्यच होते, तरीही त्यांनी कोणत्याही चमत्काराशिवाय आणि दैववादावर विसंबून न राहता कठोर परिश्रम आणि कडक शिस्तीच्या जोरावर स्वतःला या उंचीपर्यंत आणलेलं आहे हे पुढच्या पिढीला समजणं अत्यंत गरजेचे आहे. आपणही त्यांच्यातील हे उच्च कोटीचे गुण आत्मसात करून ती ऊंची गाठू शकतो, हे खात्री लायक पद्धतीने आत्ताच्या तरुणाईला पालकांनी सांगणं आवश्यक आहे.
आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांनी नेहमीच भेदभावाच्या भिंती पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी-विकासासाठी कार्य केलेले आहे. सद्य परिस्थितीत जर आपण आपले आदर्श ठरवू शकत नसू किंवा आपलं त्यावर एकमत होत नसेल तर आपण या सृष्टीला-निसर्गाला आदर्श मानू शकतो. तिथे तर ना कुठला धर्म आहे ना जात आहे. तिथे ना कुठल्या सीमा आहेत ना कोणती बंधनं आहेत. तो सर्वसमावेशक आहे. पहिलं निसर्गाकडून या सृष्टीकडून शिकुया की माणूस म्हणून कसं जगायचं ते…! आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा माणूस निसर्ग नियमाप्रमाणे कार्य करतो तेव्हाच तो उच्च कोटीचा आदर्श स्थापित करू शकतो. निसर्गाचा मूळ स्वभाव आहे देण्याचा आणि तो देत राहतो. आपल्या महापुरुषांनी हेच केलं आहे. त्यांना जे उदात्त ज्ञान प्राप्त झाले ते त्यांनी सकल जनांना मुक्तपणे दिले. निसर्ग त्याच्या रंगांची मुक्त उधळण करताना कोणताही भेदभाव करत नाही, त्याचप्रमाणे आपले जे आदर्श असतात ते नेहमीच समतेची शिकवण देतात, सर्व मानवनिर्मित भेदांच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीला ज्ञान देतात ,प्रेमाची मुक्त उधळण करतात. निसर्गाचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे भिन्न भिन्न घटकांचे सहअस्तित्व मान्य करुन पुढे जाण्याचा. आपले आदर्श असणाऱ्या महापुरुषांनी वारंवार हीच गोष्ट अधोरेखित केलेली आहे की सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन आपण विविधतेतून एकता साधत संपूर्ण मानवजातीचा विकास केला पाहिजे, व्यक्ति आणि समाज उन्नत होण्यासाठी ही बाब आवश्यक आहे. निसर्गाचा सगळा डोलारा ज्या मूलभूत भावावर उभा आहे तो भाव म्हणजे ‘प्रेम’. द्वेष, मत्सर आणि तिरस्कार या प्रेमविरोधी भावना आहेत आणि यावर आजतागायत कोणताही समाज, कोणताही देश, किंबहुना संपूर्ण विश्वच उभे राहू शकत नाही, हे आधी आपल्याला समजलं पाहिजे मग आपण ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू. इतिहासात डोकावून पाहिलं तरी आपल्या सहज लक्षात येईल ज्या ज्या सम्राटांनी, राजांनी धर्माच्या आधारवर राज्य चालविण्याचा, समाजाची बांधणी करण्याचा प्रयत्न केला ती साम्राज्य, राज्य लयाला गेली. धर्म, जाती, पंथ हे मानवनिर्मित आहेत. त्यांचं औचित्य आता राहीलं आहे का याचाही आपण कधीतरी पुनर्विचार केला पाहिजे. भूतकाळ आणि वर्तमान यांची योग्य ती सांगड घालून भविष्याची बांधणी केली पाहिजे. इतिहास धरून न बसता इतिहासातून शिकले पाहिजे. त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. मानवी मनाला देखील निसर्गाप्रमाणे उत्क्रांत होता आलं पाहिजे.
जर आपण मानवनिर्मित सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नसू तर आपण किमान निसर्गाचा तरी आदर्श घेतला पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाचा आदर्श घेऊ तेव्हाच मानवनिर्मित भिंती आपण स्वतःच पाडायला सुरुवात करू. निसर्गात सहस्तित्त्वाचे तत्त्व आहे. तिथे असंख्य प्रकारच्या झाडे, वेली, वृक्ष, प्राणी, पक्षी, कीटक, जिवाणू, विषाणू यांच्या प्रजाती आहेत. ते सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पक्षी झाडांची फळ खातात आणि बियांचा प्रसार करतात, मधमाशा फुलांकडून मध घेतात आणि परागीभवनाला मदत करतात. निसर्गात कोणीच गरजेपेक्षा जास्तीचा साठा करून ठेवत नाही ज्याला जेवढी गरज तेवढाच ते वापर करतात. जास्तीचं आपोआपच वाटलं जातं. हे समजून घेतलं की भांडवलवाद अति प्रमाणात का नको हेही समजतं. समाजवाद किंवा साम्यवादाची गरजही समजते. जे ताठर आहे, जे वाकत नाही ते टिकत नाही हा निसर्ग नियम आपण समजून घेतला पाहिजे. निसर्गातला प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे आणि त्यातला एकही घटक जर नसेल तर कोणाचंच अस्तित्व राहणार नाही ही साधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. टोकाचा साम्यवाद जितका घातक तितकाच अति भांडवलवाद सुद्धा घातक आहे. मनुष्य हाही निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच माणसाने निसर्गनियमांचे पालन केले पाहिजे. फक्त मानव हाच घटक निसर्गाच्या विरोधी वर्तन करुन संपूर्ण जगाला धोका निर्माण करत आहे. त्यासाठीच, विविधतेतून एकता हे तत्व आपणच आपल्या अंगी बाणवलं पाहिजे तरच आपणही आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकू. जेव्हा निसर्गाकडे डोळसपणे बघू तेव्हा मानवनिर्मित भिंती आपोआप ढासळतील आणि प्रत्येक माणसाकडे आपण नव्याने बघायला शिकू. माणसातला माणूस समजून घेऊन जगणं किती सोपं आहे हे आपल्याला निसर्ग शिकवतो. यासाठी आधी आपण निसर्गाशी मैत्री केली पाहिजे. निसर्गाचे मूलतत्व म्हणजे सहअस्तित्व आणि निसर्गाचा मूलभाव म्हणजे प्रेम हे समजून घेतलं पाहिजे आणि या तत्त्वाचा आणि या भावनेचा यथोचित आदर केला पाहिजे. आपणा सर्वांना जेव्हा हे समजेल, तेव्हा आदर्श कोणाला मानायचे आणि त्यांच्याकडून काय शिकायचे ते आपोआपच समजेल.
कोणत्याही गोष्टीने प्रभावित होणे ही गोष्ट वाईट नाही परंतु, त्याविषयी सारासार विचार न करता ती अमुक अमुक व्यक्तीने सांगितली आहे म्हणून ती मान्य करुन तिने प्रभावित व्हायचं आणि त्यातूनही पुढचं म्हणजे, तेच बरोबर आहे असा दुराग्रह बाळगून इतरांनीही ती मान्य करावी असं वाटणं हे वाईटच. प्रत्येकाच्या विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्यांच्या विचारांचा आदर करता येणे आवश्यक आहे. विचार मान्य नसल्यास त्यावरही साधक बाधक चर्चा होऊ देणे आवश्यक आहे. आपले आदर्श हेही माणूस होते आणि मानवी मर्यादा त्यांनाही लागू पडतात हेही मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. या उलट आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांनी या मर्यादा ओलांडून ‘न भूतो न भविष्यती’ असे महान कार्य केले आहे याचा आदर्श आपण मानला पाहिजे आणि त्यांच्या या गुणांना आचरणात आणण्याचा कायम प्रयत्न केला पाहिजे. आपण ही जाणीव आपल्या मनात ठेवली पाहिजे की आपण आपल्या आदर्शांच्या श्रेष्ठत्वासाठी भांडत बसून त्यांच्या महान कार्याचा अपमान करत आहोत. त्यांच्या कार्याला कोणाच्याच शिक्कामोर्तबाची गरज नाही. ज्यांचे कार्य महान आहे त्यांची ओळख कुणीच पुसून टाकू शकत नाही, तुम्ही आम्ही तर नक्कीच नाही.
या सगळ्या आदर्शवादाच्या भांडणात, संघर्षात नवीन पिढी गोंधळून गेली आहे, दिशाहीन झाली आहे. इंटरनेटच्या जगात नको त्या माहितीचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. कोण खरे कोण खोटे हे त्यांना समजणं अवघड झालं आहे. काही समाजमाध्यमे, संस्था आणि व्यक्ती त्यांचा बुद्धीभेद करुन त्यांना विघातक गोष्टींकडे वळवत आहेत. या पूर्वीही असे घडत होते, परंतु त्या काळात समाजाला एकसंध ठेवणारे समाजातील घटकही सजग होते, जागृत होते. आत्ताच्या परिस्थितीत हे घटक दुर्बल झालेले आहेत, बेसावध आहेत. त्यामुळेच नवीन पिढीला हे सगळे सांगण्याची, समजावण्याची जबाबदारी ही पूर्णपणे पालकांवर पडलेली आहे. जेव्हा पालक मुलांना हे सांगतील तेव्हा मुले एकमेकांत ही चर्चा करतील. चर्चा करतील तेव्हा त्यांना प्रश्न पडतील आणि प्रश्न पडले की ते उत्तरं शोधतील. फक्त त्यांना योग्य प्रश्न पडण्यासाठी आणि त्यांची उत्तरे योग्य ठिकाणी शोधण्यासाठी तर्काने विचार करण्याची सवय लावण्याची जबाबदारी याक्षणी तरी पालकांची आहे. आत्ताचे पालक हे आपले आदर्श आणि नवीन पिढी यांना जोडणारा एकमेव दुवा आहेत. जर पालक यात यशस्वी होऊ शकले तर नवीन पिढीचे आणि परिणामतः देशाचे भवितव्य उज्ज्वल असेल. शेवटी इतकच वाटतं की आपल्या या महान आदर्शांचा यथोचित सन्मान करणे, याचाच आदर्श नवीन पिढीला आपण घालून दिला पाहिजे. असे झाले तरच नवीन आदर्श जन्माला येतील.
…ललिता जगताप…
lalita.jagtap@gmail.com

