
आमचे आजोबा गोपाजी गायकवाड भारतीय रेल्वेच्या परेल लोको वर्कशॉप मध्ये कामाला होते. आमच्या जन्माच्या किमान दहा-पंधरा वर्षांपूर्वी आजोबा निर्वतले होते. आजी तुळसाबाईनं मरेपर्यंत किमान वीस वर्षे गावाकडं आमचा सांभाळ केला. आजी प्रचंड करारी होती. खणखणीत आरोळी असायची. रानात जनावर घुसलं तर आजीचा आवाज आसमंतात घुमायचा. आदरयुक्त भीती इतकी होती की अख्खा गाव तिला चळाचळा कापायचा. तिच्या जगण्याचा एक नियम होता घरी आलेल्या प्रत्येकाला ‘टुकडा’ द्यायचा. तिच्याबद्दल सांगायला गेलं तर पुस्तक अपूरं पडेल. आजी फणसासारखी होती. वरुन जितकी कठोर तितकी आतून प्रेमळ आणि मऊ. जगण्याची रित-भात संस्काराचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो.
श्रावण गायकवाड आणि आशा गायकवाड यांच्या लग्नाचा नुकताच पन्नासावा वाढदिवस पार पडला. मागे वळून पाहिल्यानंतर सगळ्या संघर्षाचा पट उलगडत घडत जातो. सत्तरीच्या दशकात श्रावण गायकवाड यांचे वडील आणि माझे आजोबा गेल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर ते मुंबईत रेल्वेमध्ये लागले. रेल्वेच्या तुलनेत पगार जास्त म्हणून फिलिप्स कंपनी ची नोकरी धरली. शेवटी तिथूनच निवृत्त होऊन पुन्हा गावाकडे गेले.

अडचणीत संकटात असलेल्या माणसांसाठी धावून जायचं हा वडिलांचा स्थायीभाव. अनेकदा या स्वभावापाई कुटुंबाला भरपूर काही भोगावं लागलं. त्यांनी मात्र कधी त्याची तमा बाळगली नाही. आजही बाळगत नाहीत.नंतर-नंतर आम्हाला देखील हा स्वभाव आमच्या आयुष्याचा भाग झाला. हॉस्पिटल मध्ये आजही कॅन्सर किंवा टीबी पेशंट मयत झाल्यानंतर त्याला शिवायला लोकं धजत नाहीत. ही कामे करण्यास नाना सदैव पुढे असतात. गावाकडे आमचे घर रानात आहे. गावापासून दोन किलोमीटर दूर.शेतातूनच कल्याण-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 जातो. घराच्या मागं चढावर एक्सीडेंट प्रोन वळण आहे. आठवड्याला एक अपघात ठरलेला. आधी मोठा आवाज येतो. त्यानंतर लोकांच्या किंकाळ्या आणि त्यानंतर वाहणारे रक्ताचे पाट. माझी आई आशाबाई आणि वडील दोघांच्याही कानी हे आवाज नेहमीच पडतात. अपघात झाला की पाणी घेऊन रस्त्यावर दोघांनी पळायचं.102 नंबर ला फोन करून ॲम्बुलन्स बोलावायची. रक्तबंबाळ मानवी देह हाताने उचलून ॲम्बुलन्स मध्ये ठेवायचे. हे करताना नानांच्या चेहऱ्यावर मला कधीही भीती वाटली नाही. हायवेला संविधान . येणारे वाटसरु पाणी पिऊन पुढच्या वाटेला लागतात.
दुष्काळ पडल्यानंतर चारा छावणीसाठी स्वतःच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देणे किंवा हायवे लगत मोफत पाण्याची पाणीपुरी आणि अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या उच्च महाविद्यालयासाठी मोफत पाणी देण्याची कृतीही पाण्याचा संघर्ष असं मला आठवतं.

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना उपस्थितांना उद्देश्यून हे त्यांनी भाषण केले होते. महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. त्यानंतर हा दिवस हा दिवस ‘समता दिन’ (Equality Day) तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.
महाड हे कोकणातील शहर या सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व ती तयारी दाखवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय सहभागी झाले ते अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्यासोबतच अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मदत करण्यासाठी या सत्याग्रहात उतरले होते.

96 वर्षापूर्वी झालेल्या या घटनेने नेमकं काय झालं? माझ्यासारखा दुष्काळी भागातून आलेला माणसाला जर विचाराल? पाणी काय असतं ते वेगळं सांगायची गरज नाही.. पाण्याचं आजही अप्रुप आहे..
निसर्गचक्रामुळे अलीकडच्या काळात आमचा दुष्काळ संपला आहे.. वडिलांच्या भगिरथ प्रयत्नामुळे दुष्काळातही सध्या विहिरीचं पाणी बारा महिने जात नाही. फार नाही पाच वर्षांपूर्वी दुष्काळामुळे शेतात जनावरांची छावणी उभारली होती. पाण्याचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेस बाबांनी विहीर छावणीसाठी उघडी करून दिली होती..
आमचा दुष्काळ संपलाय पण गावाचा दुष्काळ अजूनही संपलेला नाही. त्यामुळे शेतापासूनच जवळ असलेल्या माळरानावर अहमदनगर जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचं महाविद्यालय सुरू झालं. महाविद्यालय सुरू झालं खरं परंतु पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम होता. गावातली शहाणी माणसं गळ घालत होती.. परंतु दुष्काळाच्या चटके बसलेला माझ्या मनाची सहमती पटकन होत नव्हती. अखेर वडिलांची इच्छाशक्ती कामाला आली.. 2HP पाईपलाईन शेतातील विहिरीवरून महाविद्यालयासाठी देण्यात आली.
आता बाबा ६ डिसेंबरला मुंबईला आले होते आम्ही शिवाजी पार्कला होतो. एका स्टॉलवर मोफत पाणी वाटत होतं.. मला फार कौतुक वाटलं.. ज्या समाजाला हजारो वर्ष पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं तो समाज पाणी वाटतोय..

खरंतर पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे.. या पृथ्वीतलावर असलेल्या प्रत्येक किडी मुंगी आणि प्राणिमात्राचा त्यावर अधिकार आहे..
महात्मा फुलेंनी किती उदार अंतकरणाने त्यांचा 1868 घरचा हौद अस्पृश्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी खुला केला असेल.
आजही विषमता असलेलं पाण्याचं राजकारण आणि बाजार खुल्या पद्धतीने सुरू आहे..
20 मार्च 1927 रोजी हजारो वर्षांच्या तहानेची व्याकूळता क्षणात भीमानं संपवली…
माझ्या बापाने केलं मी काय करतोय? असा प्रश्न देखील उपस्थित होतो.
दुष्काळी पारनेर तालुक्यामधील घरटी माणूस मुंबईला होता. रेल्वेत काम करणारे आजोबांना घर मोठं असल्याने पगारही पुरत नव्हता. परेलच्या रेल्वे चाळीत राहताना आमच्या आजीने बाटल्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तिचं कपाळभर कुंकू असायचं त्यामुळे तिला ‘लालीबाई’ नावाने ओळखला जायचं. बाटली खरेदी करून विकायची म्हणून ‘बाटलीवाली’ बाई म्हणायचे.
आजीचं माहेर म्हणजे आमच्या शेजारचं गाव कर्जुले हरेश्वर. रोकडयांची एकमेव कन्या गायकवाडांची सुन झाली. लग्नानंतर आजी पुरे पुर टाकळीकर झाली. काही वर्षांनंतर तिच्या माहेरी कर्जुले हरेश्वरला वारसाचे मुद्दे उपस्थित झाले. आमच्या चुलत्यांनी कागदपत्र गोळा करून वारसा हक्काचा मुद्दा लावून धरला. पण आजोबांना हे मान्य नव्हतं. माझं ते माझं.. दुसऱ्याची नको असं सांगत आजीने माहेरचा प्रॉपर्टीचा हक्क सोडून दिला.
भारतीय रेल्वेत काम करणारे माझे आजोबा गोपाळा गायकवाड चळवळीचे खंदे कार्यकर्ते.डॉ.आंबेडकर यांच्या सानिध्यात येऊन त्यांनी 1956 ला नागपूरला जाऊन धम्मपरिवर्तन केले. येताना ते गावी नगरला आले. आजीला घरातले सगळे देव बाहेर काढायला लावून विसर्जित केले.त्याच वर्षी (१९५६) माझे वडील श्रावण गायकवाड यांचा जन्म झाला. मुंबई ते टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि.अ.नगर असा गायकवाड कुटुंबाचा प्रवास चालू होता.
72 च्या दुष्काळात ग्रामीण भाग भरडून निघाला होता. त्याच्या दुसऱ्या वर्षी मुंबईत धो धो पाऊस चालू होता 13/ 7/1973 म्हणजे आमच्या जन्माच्या किमान दहा ते बारा वर्ष आधी. फूड पॉइझनिंग मुळे आजोबांचे मुंबईत निधन झाले. आम्ही माझगावच्या बीआयटी चाळीमध्ये राहत होतो. गावाकडं निरोप गेला. अपंग भाऊ बबन गायकवाड यांना गावीच ठेवून आजी आणि वडील मुंबईला रवाना झाले. त्यावेळी माळशेज घाट चालू नव्हता त्यामुळे खंडाळा मार्गे मुंबईत पोहोचायला पहाटेचे चार वाजले.माझे वडील श्रावण( वय 19) आणि आजी तुळसाबाई त्या भर पावसात मुंबईला पोहोचले. पहाटे चार वाजता पोहोचण्यापूर्वीच रात्रीच अंत्यविधी पूर्ण झाला होता. त्यानंतर अपंग असलेले आमचे चुलते बबन गायकवाड देखील एकटेच मुंबईत पोहोचले. त्या अपंगत्वानंतर त्यांचाही मृत्यू झाला.
आमची आजी तुळसाबाई प्रचंड करारी होती. खणखणीत आरोळी असायची. रानात जनावर घुसलं तर आजीचा आवाज आसमंतात घुमायचा. आदरयुक्त भीती इतकी होती की अख्खा गाव तिला चळाचळा कापायचा.
मी कॉलेजला असताना 1998 मध्ये माझे चुलते उमाकांत गायकवाड हृदय विकाराच्या झटक्याने वारले. त्याआधी डोळ्याचा काचबिंदू झाल्याने त्यांची नजर गेली होती. चार ते पाच वर्ष आम्ही गावाकडे त्यांचा सांभाळ केला.
त्याच दरम्यान उल्हासनगरला राहणारी एक चुलत बहीण कल्पना (शिक्षिका) आणि तिच्या मिस्टरांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची मुलं केतन ( वय-८)आणि आलोक (वय-५) आम्हीच सांभाळ केला.चुलते उमाकांत यांचं मुंबईला (१९९८) आले असता त्यांचे निधन झाले.मुंबईतच त्यांचा अंत्यविधी झाला.
आजीला ही बातमी आम्ही अनेक दिवस दिली नव्हती. शेवटी ही बातमी तिला कळलीच. त्यानंतर तिनं हाय खाल्ली. वृद्धापकाळानं मुळे ती थकली होती. एकदा ती पडली आणि फॅक्चर झालं. त्यानंतर माझे वडील श्रावण गायकवाड आणि आशा गायकवाड यांनी तिची शेवटपर्यंत सेवा केली. ती सेवा इतकी कठोर होती, की मला आठवलं की डोळ्यातून पाणी येतं. आजूबाजूचे लोक म्हणायचे की आईची एवढी सेवा करतात तुमच्या मुलांना हे पुण्य मिळेल आणि त्यांचं चांगलं होईल
आजीला मरेपर्यंत रेल्वेची पेन्शन मिळत होती.
त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होती. आमच्या घरातील जवळपास दहा ते बारा भावंडांना ती आळीपाळीने अंडी खाऊ घालायची. घरात मुलांनी सगळ्यात आधी खाऊन घ्यावं उरलंसुरलं ज्येष्ठांनी खावं असं तिचं सूत्र होतं. तिच्या बोलण्यात अनेक इंग्रजी शब्द यायचे, उदा. Insult शब्दाला इन्साट म्हणायची.

माणसं ओळखण्यात ती वाकबदार होती. त्यामुळे पुढे जाऊन भांडण होऊ नये म्हणून ताबडतोब शेतीच्या आणि घरच्या वाटण्या करून घ्यावा यासाठी ती आग्रही होती.आमचे वरिष्ठ बंधू डॉ. गिरीश गायकवाड यांच्यावर आजीचं विशेष प्रेम होतं.आमचे आजोबा गोपाबाबा ( आजोबा) हे पुनर्जन्म घेऊन आली तशी तिची धारणा होती. त्यामुळेच गिरीश असं नामकरण केलं होतं.
मला आठवतय आजी आम्हाला ओरडायची परंतु डॉ. गिरीश यांना ती नेहमी ‘अहो, गायकवाड’ अशी आदरार्थी संबोधायची. गावात आजीचा जाम वट होता. आम्ही १ तारखेला पेन्शन आणायला बँकेत जायचो. परत येताना आजी उठत-बसत सर्व देणीदारांची देणी पूर्ण करून घरी पोहोचायची.
आजी-आजोबांचा हा समृद्ध वारसा माझी आई आशा गायकवाड आणि वडील श्रावण गायकवाड यांनी पुढे नेला.
माझे वडील श्रावण गायकवाड गावाकडे लहानचे मोठे झाले. 1974 मध्ये पळशी गावामधून स्थळ आले. सावित्रा साळवे यांची कन्या आशाबाई टाकळी ढोकेश्वरच्या गायकवाड कुटुंबाच्या सून झाल्या. श्रावण गायकवाड यांचे शिक्षण मॅट्रिक पास, तर आशा गायकवाड फक्त सातवी उत्तीर्ण. नोकरीच्या निमित्ताने श्रावण गायकवाड सदैव मुंबईकडे होते. हळूहळू आशाबाई गायकवाड कुटुंबाच्या भाग झाल्या. शेती आणि संसाराचा गाडा सासुबाई तुळसाबाई गायकवाड यांच्या मदतीने हाकू लागल्या. 1979 मध्ये थोरले बंधू गिरीश यांचा जन्म झाला. 1981 मध्ये विजय तर 1983 मध्ये सतीश आणि 1986 मध्ये प्रज्ञा.
श्रावण गायकवाड यांची मुंबईला नोकरी सुरू होती. सर्व मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा टाकळी ढोकेश्वर येथे सुरू होते. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर सर्वांचे माध्यमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वर या ठिकाणीच बारावीपर्यंत पार पडले.

या शिक्षणाचा मोठा संघर्ष आहे. लहानपणापासून घरामध्ये वडील श्रावण गायकवाड चळवळीची पुस्तके घेऊन यायचे. सर्वच मुलांना या पुस्तक वाचनाची प्रचंड गोडी लागली. प्रसंगी पुस्तक वाचनावरुन भावंडांमध्ये प्रचंड संघर्ष देखील व्हायचा.
आई आशा गायकवाड यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. सर्व मुलांना शिक्षणाच्या बाबतीत तिने संपूर्ण मार्गदर्शन केले. त्यावेळी वडील श्रावण गायकवाड मुंबईला होते परंतु एकट्या आईने घरातील संयुक्त कुटुंबाचे घरकाम शेती जनावरं आणि मुलांचे शिक्षण हे हाती सांभाळले. आयुष्याच्या या संघर्षात आणि बिकट परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही हे विशेष.
टाकळी ढोकेश्वर गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आणि तेथील शिक्षण चौघा भावंडांसाठी पुरेसे ठरले. बारावीपर्यंतचे बेसिक शिक्षण झाल्यानंतर आता शिक्षणासाठी गावाबाहेर पडण्याची ती वेळ होती.
‘शिकाल तर टिकाल’ या मंत्रा प्रमाणे सगळे भावंडं शिकत राहिले. सायन्स घ्यायचे की आर्ट हे कोणालाच ठोक नव्हते परंतु मोठ्या भावाने (डॉ. गिरीश) यांनी दीपस्तंपासारखी भूमिका घेतली. त्याच्या शिक्षणापाठोपाठ सगळ्यांनी शिक्षणासाठी परिश्रम घेतले.बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये सर्वांनी शिक्षण पूर्ण केले.

साधारणपणे 25-30 वर्षांपूर्वीचा हा कालावधी. सर्वत्र डीएड चा बोलबाला होता. थोरले बंधू गिरीश चांगल्या मार्काने पास झाले होते सहज डीएडला नंबर लावून मास्तर होण्यासारखी परिस्थिती होती. याच दरम्यान श्रावण गायकवाड यांनी शेतीमध्ये लक्ष घातले होते. मुंबईतील नोकरी सोडून शेतीमध्ये लक्ष घालावे असाच साधारण विचार होता. त्याच दरम्यान स्वेच्छा निवृत्तीचा विचार देखील मनात येत होता. एका बाजूला शेतीचा विकास आणि दुसऱ्या बाजूला गावात मोठ्या घराची बांधणी सुरू होती. मोठे बंधू गिरीश यांनी डीएडच्या ऍडमिशन रद्द करून थेट बी.ए.एम एस. साठी सावंतवाडीच्या भाई साहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुसरे बंधू त्यावेळेस बारावीला होते. त्यांनीही डीएडच्या ऍडमिशन सोडून पुण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या मुंबईतील शासकीय कृषी महाविद्यालय पुणे-5 मध्ये बीएससी ऍग्री साठी प्रवेश घेतला.
तिसरे बंधू सतीश यांनी थेट मेरिटवर महाराष्ट्र मत्स्य व पशुविज्ञान विद्यापीठ ( माफसू) अंतर्गत असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी BVSc साठी प्रवेश घेतला. सर्वात धाकटी प्रज्ञा हीनेही बारावीनंतर फार्मसी साठी प्रवेश घेतला. दुष्काळ आणि निसर्गाचा फटका बसलेली शेती आणि घराचे बांधकाम त्यात स्वेच्छा निवृत्ती या सगळ्या प्रक्रियेमध्ये चारही मुलांच्या शिक्षणामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला.यात संघर्षातून सगळ्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

थोरले डॉ. गिरीश गायकवाड सध्या नेरळ जि. रायगड येथे राहतात. शेजारच्याच आदिवासीबहुल कळम गावात ते वैद्यकीय पूर्णवेळ सेवा देतात. वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले असून ते शक्य त्या ठिकाणी सामाजिक सेवेमध्ये झोकून देतात. त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा गायकवाड नेरळ या ठिकाणी यशस्वी डेंटल क्लिनिक चालवतात. या दांपत्यांना श्रेया नावाची एकमेव मुलगी असून ती सध्या दहावीचे शिक्षण घेते.

दोन नंबरचे विजय यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण करून कृषी पत्रकारितेमध्ये करिअर निवडले. बीएससी ॲग्रीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी कृषी पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन दैनिकाचे मंत्रालय प्रतिनिधी म्हणून त्यांनी तब्बल तेरा वर्षे काम केले. त्यानंतर ईटीवी भारत आणि मॅक्स महाराष्ट्र सोबत पत्रकारिता करून सध्या ते मुंबईमध्ये मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांच्या पत्नी आश्लेषा या फार्मसी ग्रॅज्युएट असून एमबीए झाल्या आहेत एका जगप्रसिद्ध आर्ट फर्म साठी रिसोर्स पर्सन म्हणून त्या मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आरव (12) हा मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शिकत असून चांगला हॉकीपटू आहे.

तिसरे बंधू डॉ. सतीश गायकवाड यांनी शिरवळच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयात Bvsc चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण (Mvsc) आणि पीएचडी भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्था (IVRI) येथून पूर्ण केले. पोस्ट-डॉक्टरेट साठी त्यांनी दक्षिण कोरियातून पूर्ण करून तिथेच दीर्घकाळ पशुवैद्यकीय संशोधन केले. डॉ. सतीश यांच्या पत्नी डॉ. उषाराणी गायकवाड यांनीही पशुवैद्यकीय क्षेत्रात पीएचडीचे शिक्षण केले असून दोघांनी दीर्घकाळ दक्षिण कोरिया मध्ये संशोधनाचे एकत्र काम केले. डॉ. सतीश यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयात बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक पदाची जबाबदारी देखील सांभाळली. तीन वर्षाच्या सेवेनंतर डॉ. सतीश यांनी पुण्यामधील राष्ट्रीय विषाणू संस्था ( NIV) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी स्वीकारली. डॉ. सतीश आणि डॉ. उषाराणी यांना सेजल नावाची मुलगी असून हे सर्व सध्या पुण्यामध्ये वास्तव्य करतात.

कन्या प्रज्ञा पनवेल या ठिकाणी फार्मसी व्यवसायात कार्यरत असून तिला सम्यक नावाचा मुलगा आहे.

मागील तीस वर्षावर नजर टाकली.. तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते संघर्ष संघर्ष आणि संघर्ष…
वडिलांनी मुंबई सोडली… गावाकडे आले तेव्हापासून या संघर्षाची सुरुवात झाली… शिक्षणाच्या निमित्ताने आम्हा भावंडांनाही हा संघर्ष चुकला नाही… शिकलो संघर्ष केला..सदा संघर्षाच्या केंद्रस्थानी अटल आणि खंबीर होती ती आमची आशा गायकवाड आई…

आई-वडील श्रावण आणि आशा गायकवाड यांनी एवढ्या संघर्षातही समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे. स्वतःची मुलं शिकली सवरली स्थिर सावर झाली परंतु आजूबाजूला गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ते जातीने लक्ष घालतात स्कॉलरशिप असो की प्रवेश प्रक्रिया सर्व मार्गदर्शन आणि शक्य त्या ठिकाणी आर्थिक मदत देखील करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मंत्र तंतोतंत गायकवाड कुटुंबाने आयुष्यात प्रत्यक्षात आणला आहे. त्यामुळे कुठेही अन्याय आणि अत्याचार होत असेल तर गायकवाड कुटुंबातला कुठलाच सदस्य स्वस्थ बसू शकत नाही.
एवढेच काही थोर समाजसेवकाच्या छत्रछाये खाली वाढलेल्या सैनिक सहकारी बँकेने पारनेरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा गिळंकृत करणे कामी प्रस्थापितांसमोर दिलेला लढा काळे ध्वज दाखवून आपला लढाऊ बाणा दाखवून दिला आणि अतिक्रमण रोखले. गावातील दलित वस्ती सुधारणेच्या नावाखाली प्रस्थापित राजकारण्यांनी लुटलेल्या निधीची पोलखोल देखील श्रावण गायकवाड यांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून चव्हाट्यावर मांडली आहे.
एवढा संघर्ष सुरू असताना धम्माचा मार्ग सोडला नाही. आयुष्यातील मोठा टप्पा बौद्धाचार्य म्हणून मुंबई पुणे आणि अहमदनगर परिसरामध्ये हजारो लग्नविधी लावून दिले. बौद्ध हितवर्धक संस्था पारनेर, बौद्धजन पंचायत आणि भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून शक्य तेवढे योगदान आईनांनी दिले आहे.

मुंबई वरून बाप जेव्हा गावात गेला.. त्याला गाव नवा नव्हता.. पण गावपण अनुभवायला दीर्घ काळ गेला… नाना ग्रामपंचायतीचा फॉर्म भरा.. नाना सोसायटीचा इलेक्शन लागलं.. पतसंस्था, बँक, खरेदी विक्री संघ, बाजार समिती प्रत्येक इलेक्शन साठी दरवर्षी ऑफर येत होत्या… संघर्ष सुरू होता जगण्याशी नाना..नको ते आपल्याला राजकारण..! त्यामुळे सदैव या गाव-राजकारणापासून दोन हात कुटुंबाच्या सर्वसहमतीने दूर ठेवले होतं. आम्ही शिकत असतानाही आई- नानांनी जिथे प्यायला पाणी नव्हतं.. उजाड माळरान होतं तिथे आज स्वकष्टाने नंदनवन उभं केलयं.
मागच्या महिन्यात गावाकडे जाणं झालं होतं. कोविड संकटानंतर पुन्हा एकदा सोसायटीच्या निवडणुकीचे पडघम वाजत होते. गेल्या दशकभरात आमचा संघर्ष बऱ्यापैकी निवला आहे. नानांनी सोसायटी चा फॉर्म भरून टाकला होता.. यावेळी विरोध करण्याचा प्रश्नच उरला नव्हता.. पण ऐनवेळी गावातल्या राजकारणाने उचल खाल्ली.. नानांचा फॉर्म रिजेक्ट करायचं कारस्थान शिजत होतं.थोडाफार सहकाराचा अभ्यास झाल्याने पारनेरला जाऊन एकाच सुनावणीत विषय मिटवून टाकला…
आमच्या तालुक्याचे लोकनेत्याचं पारनेर चे (लोकप्रिय आमदार ) पँनल समोर होतं. आयत्या वेळी सदस्य करून मतदार यादी देखील वाढवून घेतली होती. त्यामुळे लोकनेत्याचे समर्थक अर्ज मागे घ्या आम्ही स्वीकृत सदस्य करू वगैरे ऑफर देत होते. नाना ठाम होते.. कारण हा माणूस अजात शत्रू आहे. कुणीही पुढे येऊ मदतीला धावून या जायचं हा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत जिथे एका मताचा भाव तीन हजार रुपये होता तिथे केवळ लोकसंपर्क आणि शब्दाच्या विश्वासावर एक पैसाही न देता बाप ताठ मानेनं सर्वाधिक मतांनी निवडून आलाय..! लोकनेत्यांचे पॅनल भुईसपाट झालं. जिंकण्यासाठीच फॉर्म भरला होता.. असं सांगताना संघर्ष आठवून बापाच्या डोळ्यात पाणी दिसलं होतं..
आपला बाप अनेक मुंबईकर मित्रांनी अनुभवला आहे.. दीपक कैतके, राजा आदाटे त्यामुळे जाता-येता भेट आमच्या अनुपस्थितीत ऊर्जामय ठरत असते..
ताजा कलम : आशा आणि श्रावण गायकवाड यांना आदर्श माता पिता पुरस्कार वितरण 25 जानेवारी 2025 रोजी पुण्यामध्ये पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, उत्तम वक्ते, लेखक व समिक्षक होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विवेक सावंत,मुख्य मार्गदर्शक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL). लेखक, विचारवंत. अध्यक्ष-साधना ट्रस्ट, विश्वस्त, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन होते.



संघर्ष काळात आणि त्यानंतर सदैव आमच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या आमच्या बापाचा हा पहिला राजकीय ‘ विजय’ खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांसाठी प्रेरक ठरला आहे..
शिकलो..संघर्ष केला.. आता संघटित होतोयं.. म्हणून
आई- नाना कीप इट अप
हम साथ है..!
जय किसान #जय संविधान
विजय गायकवाड मुंबई
संपर्क क्रमांक:
श्रावण गायकवाड-+91 83296 89778
Email- shravangaikwad1@gmail.com
डॉ.गिरीश गायकवाड -+91 92 71 832924
drgirishgaikwad@gmail.com
विजय गायकवाड- 9870447750
vijoyonline@gmail.com
डॉ. सतीश गायकवाड
satishthebiologist@gmail.com
प्रज्ञा गायकवाड-कदम
+91 96195 62004.

Best, 👌👌