डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त — एका भेटीच्या आठवणीतून
विजय गायकवाड
७ ऑगस्ट १९२५. कुंभकोणम्, तमिळनाडू. ज्या घरात मुलाने डॉक्टर व्हावे अशी अपेक्षा होती, त्या घरात एक मुलगा जन्माला आला — आणि पुढे त्याने डॉक्टरकीऐवजी बियाणे निवडले. कारण त्याने १९४३ चा बंगालचा दुष्काळ पाहिला होता. तीस लाखांहून अधिक माणसे भुकेने मेली, हे पाहिल्यावर त्याने ठरवले — औषध काही जीव वाचवते, शेती लाखो जीव वाचवते. त्या निर्णयाचे नाव डॉ. मनकोंबू सांबसिवन स्वामिनाथन.
आज त्यांची १०१ वी जयंती. आणि ही केवळ एका शास्त्रज्ञाची जयंती नाही — ज्या देशाला एकेकाळी ‘शिप टू माउथ’ म्हणून हिणवले जात होते, त्या देशाच्या अन्नस्वावलंबनाच्या जन्मदिनाची ती आठवण आहे.
जहाजाच्या प्रतीक्षेतला देश
साठच्या दशकाच्या मध्यावर सरासरी भारतीय माणसाच्या वाट्याला दिवसाला जेमतेम ४१७ ग्रॅम अन्न येत होते. अमेरिकेच्या गव्हाच्या जहाजांची वाट पाहणे ही राष्ट्रीय सवय झाली होती. पंडित नेहरूंना नागरिकांना गव्हाऐवजी रताळे खा असे आवाहन करावे लागले होते. वसाहतवादी धोरणांनी भारतीय शेती खिळखिळी करून ठेवली होती — उत्पादकता कमी, जमिनी क्षीण, आणि शेतकरी कर्जात.
याच काळात स्वामिनाथन यांनी केंब्रिजमधून वनस्पती जनुकशास्त्रात पीएच.डी. घेतली, नेदरलँड्स आणि फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत (IRRI) काम केले, आणि मेक्सिकोत नॉर्मन बोरलॉग यांची भेट घेतली. बोरलॉग यांचे बुटके (dwarf) गव्हाचे वाण हेच पुढे हरितक्रांतीचा कणा ठरले.
१९६३ मध्ये स्वामिनाथन यांनी बोरलॉग यांचे मन वळवून मेक्सिकन गव्हाचे वाण भारतात आणले. १९६६ मध्ये देशभरातील प्रयोगासाठी १८ हजार टन बियाणे आयात झाले. ही वाटचाल सोपी नव्हती — परकीय जर्मप्लाझमवरील अवलंबित्वाची नोकरशाहीला भीती होती, बंदरात आणि कस्टममध्ये माल अडत होता, आणि शेतकरी आपल्या उंच, ओळखीच्या वाणांना चिकटून बसले होते.
स्वामिनाथन यांनी हे अडथळे आकडेवारीने आणि पायपिटीने पार केले. ते स्वतः कुटुंबासह शेतांत फिरून शेतकऱ्यांच्या हातात बियाणे ठेवत. पंजाबात पेरणीच्या हंगामात वेगाने वाटप व्हावे म्हणून बियाण्यांची पाकिटे शिवण्यासाठी त्यांनी तुरुंगातील कैद्यांची मदत घेतली होती.
एक बारकावा त्यांच्या शेतकरी-नजरेची साक्ष देतो: मेक्सिकन गहू तांबडा होता. भारतीय चपाती-नानसाठी तो चालणार नाही हे ओळखून त्यांनी संकरित वाण सोनेरी रंगाचे राहतील याची काळजी घेतली. त्यातूनच कल्याण सोना आणि सोनालिका ही नावे जन्माला आली. १९७१ पर्यंत उत्पादकता दुप्पट झाली. दुष्काळाच्या उंबरठ्यावरचा देश चार वर्षांत अतिरिक्त उत्पादनाकडे गेला.

‘शेतकरी प्रथम’ — आणि शेत हीच प्रयोगशाळा
स्वामिनाथन यांचे खरे वेगळेपण वाणात नव्हते, दृष्टिकोनात होते. शेत ही देखील प्रयोगशाळा आहे आणि शेतकरी हा देखील शास्त्रज्ञ आहे — किंबहुना तो आपल्यापेक्षा अधिक जाणतो, असे ते सांगत. शास्त्रज्ञाने उपाय सुचवण्यापूर्वी ऐकले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.
म्हणूनच ते रविवार-सुट्ट्या गावांत घालवत — मातीतील ओलावा, बियाण्याचे दर, किडींचा प्रादुर्भाव विचारत बसत. ओडिशात आदिवासी महिलांसोबत काम करून भाताचे वाण सुधारले. तमिळनाडूच्या कोरडवाहू पट्ट्यात क्षारसहिष्णू पिके पुढे आणली. पंजाबातील बड्या जमीनदारांना त्यांनी स्पष्ट सांगितले होते की केवळ विज्ञानाने भूक संपणार नाही — विज्ञानाला करुणेची सोबत लागेल.
राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २००४ ते २००६ या काळात पाच अहवाल दिले. अखेरच्या अहवालाने शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी जाऊन सर्वंकष राष्ट्रीय शेतकरी धोरणाची मागणी केली — जी आजही देशाच्या अजेंड्यावर आहे. वयाच्या ९८ व्या वर्षीही ते पंजाब-हरियाणातील आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले होते.
त्यांचा प्रभाव भारतापुरता नव्हता. IRRI चे पहिले भारतीय महासंचालक म्हणून त्यांनी इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्समध्ये अधिक उत्पादन देणारा भात नेला. कंबोडियाची भात जनुकपेढी पुन्हा उभी करण्यात मदत केली, इथिओपियाच्या दुष्काळात आफ्रिकी कृषितज्ज्ञांना साथ दिली, चीनच्या संकरित भात कार्यक्रमाला दिशा दिली आणि आफ्रिकेच्या हरितक्रांतीची ठिणगी पेटवली.
१९८७ मध्ये जागतिक अन्न पुरस्काराचे (World Food Prize) ते पहिले मानकरी ठरले. १९७१ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराची बरीचशी रक्कम त्यांनी ग्रामीण शिष्यवृत्त्यांना दिली. २०२४ मध्ये देशाने त्यांना भारतरत्न देऊन ऋण मान्य केले.
आणि हरितक्रांतीच्या मर्यादाही त्यांनीच सांगितल्या
हरितक्रांतीची किंमत मोजावी लागली हे नाकारणारे स्वामिनाथन नव्हते. भूजलाचा उपसा, जमिनीचा ऱ्हास, कीडनाशकांचे अवशेष, गहू-भाताच्या एकपीक पद्धतीने घटलेली जैवविविधता — या सगळ्याची जबाबदारी त्यांनी नाकारली नाही. उलट नव्वदच्या दशकात त्यांनी ‘सदाहरित क्रांती’ (Evergreen Revolution) ही संकल्पना मांडली: पर्यावरणाची हानी न करता उत्पादकता वाढवणे. पुढची प्रगती खतांवर नव्हे, तर पाणी-माती-बियाण्यांच्या संवर्धनावर अवलंबून असेल, असा त्यांचा इशारा होता.
ताज हॉटेलमधली ती सकाळ
हे सगळे मी पुस्तकातून वाचलेले नाही. या माणसासमोर बसण्याचे भाग्य मला मिळाले होते.
२००९ ची गोष्ट. मी ‘ॲग्रोवन’चा बातमीदार म्हणून मुंबईच्या फोर्ट कार्यालयात होतो. नेहमीप्रमाणे संपादक निशिकांत भालेराव यांचा फोन आला — “अरे विजय, एपी सरांचा (सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार) निरोप आहे. कोरडवाहू शेतीसंदर्भातली एक संज्ञा त्यांना डॉ. स्वामिनाथन यांच्याकडून समजून घ्यायची आहे.”
चेन्नईतील एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशनला फोन केला. कळले की डॉ. स्वामिनाथन मुंबईतच आहेत, ताज हॉटेलमध्ये उतरले आहेत. वयाची ऐंशी ओलांडलेला हा शास्त्रज्ञ — कोणताही सहायक नाही, हातात भ्रमणध्वनी नाही — कामासाठी एकटा मुंबईत थांबला होता.
मी तडक ताज गाठले. रिसेप्शनने नम्रपणे सांगितले की खोलीचा तपशील देता येणार नाही, पण साहेब बाहेर गेले आहेत, थोडे थांबलात तर लाउंजमध्ये भेटतील. अर्ध्या तासात पांढऱ्या केसांचे एक वृद्ध गृहस्थ कोणाच्याही आधाराशिवाय चालत आत आले. मी ओळखले, उठून सामोरा गेलो, ओळख करून दिली.
त्यांनी मला लाउंजच्या सोफ्यावर शेजारी बसवून घेतले. माझ्या तेव्हाच्या साध्या फोनवरून अभिजीत पवार यांना लावून दिला. पुढची वीस-पंचवीस मिनिटे — आजोबांकडून नातू समजून घ्यावा तशा संयमाने — त्यांनी कोरडवाहू शेतीविषयीच्या सगळ्या शंका सोडवल्या.
फोन संपला. निरोप घेण्याची वेळ आली. मी विचारले, “Dr. Swaminathan, if you don’t mind, I wish to have your interview for Agrowon.”
उत्तर आले — “Beta, today I am busy with meetings. Tomorrow morning you come to my room, we will talk.”
त्या तेजस्वी चेहऱ्याचा सुरकुतलेला हात हातात घेऊन मी निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्र अभय जोशी यांच्यासोबत ताजमध्ये जाऊन डॉ. स्वामिनाथन यांची विशेष मुलाखत घेतली.
“संवर्धित शेती म्हणजे अहिंसक शेती”

त्या मुलाखतीत त्यांनी जे सांगितले, ते आजच्या हवामान-बदलाच्या काळात आणखी खरे वाटते.
दिल्लीत तेव्हा चौथी जागतिक संवर्धित शेती परिषद झाली होती. संवर्धित शेतीची (Conservation Agriculture) व्याख्या त्यांनी अशी मांडली — नैसर्गिक चक्रात कोणतीही बाधा न आणता माती, पाणी आणि जैवविविधतेचे रक्षण करून, शेतकरी व शास्त्रज्ञांच्या संयुक्त संशोधनातून उत्पादकता वाढवण्याचे तंत्र.
आणि मग त्यांनी ती अविस्मरणीय उपमा दिली: गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व शेतीत लागू केले, तर जी शेती उभी राहील तिलाच संवर्धित शेती म्हणता येईल. दुसऱ्या शब्दांत तीच सदाहरित क्रांती.
त्यांचा आर्थिक दृष्टान्तही तितकाच नेमका होता — मूळ भांडवलाला हात न लावता व्याजावर संसार चालवावा, तशी शेती करावी लागेल. भारतातील बहुसंख्य शेतकरी एक हेक्टरपेक्षा कमी जमिनीचा आहे; त्याला उत्पादकता वाढ हवीच आहे, पण ती निसर्गाचे भांडवल मोडून नको.
झिरो-टिलेजबद्दलचे त्यांचे मत तर स्पष्टवक्तेपणाचे उदाहरण होते. फुकुओकांच्या ‘एका काडाची क्रांती’तील झिरो-टिलेज ही संवर्धित शेतीचा एक भाग आहे, पूर्ण संवर्धित शेती नव्हे, असे ते म्हणाले. धूप ही जिथे मुख्य समस्या आहे तिथे ती उपयुक्त; पण तमिळनाडूच्या तांबड्या घट्ट जमिनी भुसभुशीत करण्यासाठी मशागत करावीच लागते. आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असताना मशागतीऐवजी तणनाशके फवारा असे सांगणे हा कंपन्यांचा प्रचार आहे, असा रोखठोक शेराही त्यांनी मारला.
पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशाबद्दल ते सावध करत होते — वाढीव उत्पादनाच्या लालसेपोटी पाणी आणि खताच्या अतिवापराने तिथल्या सुपीक जमिनी खारवट झाल्या, भूजलपातळी खाली गेली. उर्वरित देशाने त्याचे अनुकरण करू नये, हा त्यांचा आग्रह होता. एकरी एक टन भाताचे चार टन करणे आवश्यक आहे, त्यातून ‘मार्केटेबल सरप्लस’ वाढतो — पण त्याची किंमत पर्यावरणाने मोजायची नाही.
आणि शेवटी तेच सूत्र — शेतकऱ्यांच्या सहभागाशिवाय शास्त्रज्ञ हे संशोधन एकट्याने पूर्ण करू शकणार नाहीत.
आजच्या दिवशी
आज महाराष्ट्र हवामान-बदलाच्या फेऱ्यात आहे. अवकाळी, गारपीट, लांबलेला पाऊस, खतांच्या पुरवठा साखळीतील अनिश्चितता आणि हमीभावाचा तिढा — हे सगळे प्रश्न स्वामिनाथन यांच्या अहवालांनी दोन दशकांपूर्वी ओळखले होते.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अजूनही पूर्णपणे लागू झालेल्या नाहीत, हे या जयंतीदिनी नोंदवणे हीच खरी आदरांजली ठरेल. कारण ज्या माणसाने देशाची भूक मिटवली, त्याने त्यानंतर आयुष्यभर एकच मागणी केली होती — शेतकऱ्याला त्याच्या घामाचा रास्त मोबदला मिळावा.
भारतीय शेतीला स्वयंपूर्ण करणाऱ्या या ऋषितुल्य शास्त्रज्ञाला विनम्र अभिवादन.
जय किसान, जय संविधान
— विजय गायकवाड

