जागतिक अवकाशातही वेगाने झेपावणारा भारतीय फलोत्पादनाचा ब्रॅण्ड : सह्याद्री फार्म्स

भारताच्या फळांच्या क्रांतीला गती देतो
ताजा उत्पादन उद्योगात जगाचे नेतृत्व करतो
नाशिक : सह्याद्री फार्म्स ही फलोत्पादन क्षेत्रातील एकात्मिक मूल्यसाखळी असलेली भारतातील सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी आहे. ती देशाच्या फलोत्पादन क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याबरोबरच देशात आणि जागतिक अवकाशातही भारतीय फलोत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी वेगाने झेपावत आहे.
छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समुहशक्तीचा अविष्कार असलेल्या सह्याद्री फार्म्सने आता उच्च गुणवत्तेची उत्पादने सादर करणारी शाश्वत यंत्रणा उभी केली आहे. त्यातूनच ‘सह्याद्री फार्म्स‘ ही भारताच्या फ्रेश शेती उत्पादन उद्योग क्षेत्रातील महत्वाची कंपनी बनली आहे आणि याच उद्योगात जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे.
श्री. विलास शिंदे यांनी वर्ष २०११ मध्ये ‘सह्याद्री फार्म्स’ची स्थापना केली. या कंपनीत सुरुवातीला ११० शेतकरी जोडले गेले होते. या छोट्या गटापासून ते आता एकूण ४० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर शेती करणाऱ्या २६ हजार शेतकऱ्यांच्या मोठ्या समूहापर्यंत कंपनी विस्तारली आहे. शेतकरी सबलीकरण, शाश्वत पिक पद्धती, अत्याधुनिक पुरवठा साखळी आणि पायाभूत सुविधांवर कंपनीचे अतूट लक्ष यामुळे फलोत्पादन बाजारावर प्रभुत्व मिळविण्यास कंपनी सक्षम झाली आहे. पिकाच्या लागवडी आधीपासून ते काढणी पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात अचूक आणि कार्यक्षम नियोजन करणारी तसेच शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही परस्परपूरक घटकांमध्ये दुवा ठरणारी, दोघांचेही महत्व जाणणारी इको सिस्टीम (एकात्मिक व्यवस्था) म्हणून ‘सह्याद्री फार्म्स‘ ठळकपणे समोर आली आहे.
जागतिक आव्हाने पेलण्यास सज्ज
जगभरातील शेतीउद्योगासमोर हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, पुरवठा साखळी, भौगोलिक आणि राजकीय स्वरुपाची अनिश्चितता याची आव्हाने निर्माण झालेली आहेत. याही प्रतिकूल परिस्थितीत सह्याद्री फार्म्सने प्रगतीच्या दिशेने झेपावत वर्ष २०२३-२४ मध्ये १५४८ कोटी उलाढालीचा टप्पा गाठला आहे. ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ५५ टक्क्यांनी अधिक आहे. उद्योगवाढीतील करपूर्व नफा ११.०८ टक्केसह वाढ घेत ‘सह्याद्री फार्म्स‘ने एकात्मिक मुल्यसाखळीतील स्वत:चे स्थान अजून उंचावले आहे. कंपनीने आतापर्यंत २६ हजाराहून अधिक शेतकऱ्यांकडून ३ लाख मेट्रीक टन शेतमाल उत्पादनांची खरेदी केली असून त्यावर प्रक्रिया केली आहे.
सह्याद्री फार्म्सची उत्पादन निर्मिती प्रक्रियेची कार्यक्षमता, संशोधन व विकासात होत असलेली गुंतवणूक, शाश्वत कार्य पद्धती यामुळे भारताच्या आर्थिक वृद्धीस तसेच अन्न सुरक्षेस महत्वपूर्ण हातभार लागत आहे. या बरोबरच शेती उद्योग क्षेत्रातील जागतिक आव्हाने पेलण्याची कंपनीची क्षमताही निर्माण झाली आहे.
सह्याद्री फार्म्सने जागतिक फ्रेश (ताजा) शेतमाल उत्पादनाच्या बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. कंपनी युरोप, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियातील प्रमुख बाजारपेठांसह ४० हून अधिक देशांमध्ये निर्यात करीत असून भारतातील द्राक्ष निर्यातीतील सर्वात मोठी शेतकरी कंपनी बनली आहे.
सह्याद्री फार्म्सने द्राक्षांबरोबरच केळी, डाळिंब आणि अन्य फळांची मुल्यसाखळीही उभी केली असून ही फळे उच्च गुणवत्ता व किफायतशीर दरातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवित आहेत.
गुणवत्ता, पारदर्शकता, शाश्वतता
‘सह्याद्री फार्म्स’ने सर्व लक्ष्य गुणवत्ता, पारदर्शकता (ट्रेसेबिलिटी) आणि शाश्वतता यावर केंद्रीत केले असून यातच कंपनीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. कंपनीने संशोधन व विकासावर सर्वाधिक भर दिला आहे. त्यातूनच जागतिक दर्जाच्या वाण राज्याच्या मातीत रुजविण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. कमी खर्चात अधिक व सरस तसेच जागतिक गुणवत्तेच्या पातळीवरील उत्तम (प्रिमिअम) दर्जाचे उत्पादन मिळण्याची खात्रीच या वाणांतून मिळत आहे.
मजबूत पायाभूत सुविधा
सह्याद्री फार्म्सच्या नाशिक आणि नांदेड मधील एकूण १७० एकरांच्या कार्यक्षेत्रात अत्याधुनिक प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांची फळांवरील प्रक्रिया करण्याची प्रतिदिन क्षमता ३५०० मेट्रीक टन इतकी आहे. या प्रक्रियेला अत्याधुनिक पॅकहाऊस, शीतगृहे आणि अन्य मुल्यवर्धन करणाऱ्या उत्पादन साखळ्यांची जोड देण्यात आली आहे.
यामुळे ताजा शेतमालाची टिकवणक्षमता वाढण्याबरोबरच काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत घटही होत आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन टिकाऊ व फायदेशीर व्यवस्था निर्माण झाली आहे.
शेतकरी आणि ग्राहक या मुल्यसाखळीतील सर्वात महत्वाच्या घटकांचे पूर्ण समाधान होण्यासाठी शेवटपर्यंत उत्तमोत्तम उपाय देणे हे ‘सह्याद्री फार्म्स’चे धोरण आहे. ते प्रत्यक्षात अवलंबिण्यासाठी तसेच देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेतही आपले स्थान मजबूत व वृद्धींगत करण्यासाठी ‘सह्याद्री फार्म्स’ने वेगवेगळ्या स्तरावर स्ट्रॅटेजिक बिझिनेस युनिटची (SBUs) उभारणी केली आहे. या यूनिटकडून निर्यातीचा भाग वाढविण्याबरोबरच देशांतर्गत पुरवठा साखळीवर लक्ष ठेवले जाते.
गुंतवणूक आणि विस्तार योजना
सह्याद्री फार्म्सने मागील काही वर्षांत जागतिक गुंतवणूकदारांकडून लक्षणीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ज्याचा उपयोग कंपनीची वेगवान वाढ व अधिक विस्तार होण्यासाठी होत आहे.
या गुंतवणुकीमुळे सह्याद्री फार्म्सला पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास, मजबूत डिजिटल प्लॅटफॉर्म वाढविण्यास आणि त्याचे जागतिक वितरण जाळे सक्षम करण्यास गती मिळाली आहे. भांडवलाची ही ताकद कंपनीला तिच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी तयार करत आहे. या भांडवलाच्या मदतीने सध्याच्या बाजारपेठेत स्थान अजून पक्के करणे व नवीन आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करणे शक्य होणार आहे. तीच कंपनीची यापुढील दिशा राहणार आहे.
शेतकरी, ग्राहक आणि पर्यावरण यांचे मूल्य उंचावणे
कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले:
“एक दशकाहून अधिक काळ, आम्ही संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये शाश्वत मूल्य निर्माण करताना शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही नाविन्यपूर्ण, मोठ्या स्वरुपातील आणि जागतिक बाजारपेठांमध्ये आमची पोहोच वाढवत आहोत. आमच्या या वाढीचा फायदा शेतकऱ्यांसोबतच ग्राहकालाही होत आहे. यातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत. किंबहुना यातून पर्यावरण संवर्धनाचे हितच साधले जात आहे. शेतकरी, ग्राहक आणि पर्यावरणाप्रति आम्ही वचनबद्ध आहोत.‘‘
शेतकऱ्यांच्या मालकीचा एक मजबूत ब्रँड तयार करून, सह्याद्री फार्म्स फ्रेश (ताज्या) आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांमध्ये एक विश्वासार्ह नाव म्हणून प्रस्थापित होत आहे, जे गुणवत्ता, टिकाऊपणा आणि नाविन्य यासाठी ओळखले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या सामूहिक बळावर चालवलेला हा ब्रँड केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर घरोघरी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

शाश्वततेची बांधिलकी
सह्याद्री फार्म्सची सर्व कामे व उपक्रमांच्या गाभ्यामध्ये शाश्वतता आहे. कंपनीने सौरऊर्जा निर्मिती, बायोगॅस उत्पादन आणि सूक्ष्म-शैवाल-आधारित जल प्रक्रिया प्रणालींसह पर्यावरणपूरक उपक्रमांची शृंखला सुरु केली आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, सह्याद्री फार्म्सने १०९८ मेगावॅट पेक्षा जास्त सौर उर्जा आणि बायोगॅसपासून ३,७४,२०० किलो वॅटपेक्षा अधिक ऊर्जा निर्माण केली, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी झाला. हे उपक्रम सह्याद्री फार्म्सचे पर्यावरणीय कारभाराप्रतीचे समर्पण प्रतिबिंबित करतात. यातूनच ‘सह्याद्री फार्म्स’चे शाश्वततेच्या दीर्घकालीन उद्दीष्टांशी असलेले अतूट नाते दिसून येते.
या शिवाय सह्याद्री फार्म्सने कृषी प्रकल्पांतील उप-उत्पादनांचे मुल्यवर्धन करुन तसेच त्यांना नव्याने उच्च मुल्यांच्या उत्पादनांत रुपांतर करणारी प्रणाली विकसित केली आहे.
वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन सह्याद्री फार्म्सचे वेगळेपण अधोरेखित करते.
सह्याद्री फार्म्सच्या कॅम्पसमध्ये बायोॲक्टिव्ह युनिटद्वारे कचरा, बियाणे, सालींपासून मौल्यवान संयुगांच्या निर्मितीबरोबरच सौंदर्यप्रसाधने, न्यूट्रास्युटिकल्स आणि पशुखाद्य यांसारख्या उद्योगांसाठी उत्पादने तयार करण्यात येत आहे.
जागतिक नेतृत्वासाठी सज्ज
सह्याद्री फार्म्सही भविष्यवेधी कंपनी असून देशांतर्गत बाजारात ठसा उमटविल्यानंतर ती आता जागतिक बाजारात शेतीतील फ्रेश (ताजा) उत्पादन उद्योगाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे.
नावीन्य, शाश्वतता आणि शेतकरी सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून कंपनी कृषी खाद्य क्षेत्रात नवीन मानदंड स्थापित करत आहे. आपल्या विस्तृत शेतकरी समुहशक्तीच्या व अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या साह्याने ‘सह्याद्री फार्म्स’ हा एक मजबूत ब्रँड बनला असून तो आता आंतरराष्ट्रीय व्यापारात एक प्रबळ शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे.
कंपनीची संशोधन व विकासातील , डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ब्रँड-बिल्डिंगमधील सततची गुंतवणूक ही जगातील ग्राहकांची सुरक्षित, उच्च-गुणवत्तेची आणि ट्रेसेबल उत्पादनांची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यास सक्षम ठरेल. सह्याद्री फार्म्सने जागतिक स्तरावर आपला ठसा वाढवत राहिल्याने, पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्य पोहोचवण्यासाठी ती वचनबद्ध आहे.
सह्याद्री फार्म्स ही भारतातील सर्वात मोठी शेतकरी-उत्पादक कंपनी आहे, जी सामूहिकता आणि सहकार्याच्या भक्कम पायावर बांधलेली आहे.वर्ष २०११ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी ४० हजार एकर जमिनीवरील २६ हजारांपेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार देत पूर्णत: एकात्मिक फलोत्पादन मूल्य साखळीत विकसित झाली आहे. सह्याद्री फार्म्स शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी, शाश्वतता वाढवण्यासाठी आणि उच्च दर्जाचे ताजे उत्पादन आणि प्रक्रिया केलेली उत्पादने जागतिक स्तरावर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे.
नावीन्य, शाश्वतता आणि स्केलेबिलिटी यावर लक्ष केंद्रित करून, सह्याद्री फार्म्स भारताच्या कृषी खाद्य क्षेत्राच्या भविष्याचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

