नवी मुंबई, दि. १३ : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार) वाशी येथील फळ मार्केटला पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (दि. १२) भेट दिली. या भेटीदरम्यान फ्रंट ऑफ युनायटेड फ्रुट्स असोसिएशनच्या (फुफा) वतीने अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मंत्री महोदयांना पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. बाजार फी वसुलीचे डिजिटायझेशन, फळ व भाजी मार्केटची आंतरराष्ट्रीय धर्तीवर पुनर्बांधणी आणि संचालक मंडळाची पुनर्रचना या मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
राज्य शासनाने मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा दिल्यानंतर श्री. रावल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद आले आहे. या पार्श्वभूमीवर फळ मार्केटमधील व्यापारी बांधवांनी त्यांचे अभिनंदन करतानाच धोरणात्मक अडीअडचणींकडे लक्ष वेधले.

बाजार फी वसुलीसाठी डिजिटल यंत्रणा : बाजार समितीची सेस-बाजार फी व इतर देणी ऑनलाइन पद्धतीने वसूल करण्यासाठी डिजिटल सिस्टीम बसवावी, अशी पहिली मागणी आहे. अडत्या-व्यापाऱ्यांना क्यू-आर कोडसारखे ऑनलाइन पेमेंटचे पर्याय मिळावेत यासाठी एचडीएफसी बँकेने प्रोग्राम तयार केला असून त्याचा संपूर्ण खर्च बँक करण्यास तयार आहे; ही पद्धती त्वरित अंमलात आणावी, असे निवेदनात म्हटले आहे.
३५ वर्षे जुन्या मार्केटची पुनर्बांधणी : सन १९९१ साली बांधलेले फळ व भाजी मार्केट आता पडण्याच्या स्थितीत आले आहे. पीपीपी मॉडेलद्वारे आंतरराष्ट्रीय मार्केटच्या धर्तीवर पुनर्बांधणी करावी आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्टची नेमणूक करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
३०० व्यापारी ३० वर्षांपासून गाळ्यांच्या प्रतीक्षेत : सन १९९६ साली बृहन्मुंबईतील सर्व मार्केट वाशी येथे स्थलांतरित झाले; परंतु आजही ३०० व्यापाऱ्यांना गाळे मिळालेले नाहीत. गाळे उपलब्ध होताच ते प्राधान्याने देऊ, असे एपीएमसीने मुंबई उच्च न्यायालयात मान्य केले होते. सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये गाळे बांधून तयार असतानाही ते वाटप झालेले नाहीत. १९९६ पासून या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा सेस वसूल होत असताना त्यांना कुठलीही सोई-सुविधा नाही, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता : बाजार समितीकडे पुरेसे स्टाफ-कर्मचारी नसल्याने बाजारातील कामांना मोठी दिरंगाई होत आहे. उच्चशिक्षित कुशल कर्मचारी उपलब्ध करून कारभार गतिमान करावा, अशी मागणीही करण्यात आली.
संचालक मंडळावर पाचही मार्केटचे प्रतिनिधी हवेत : राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराच्या घोषणेवेळी व्यापाऱ्यांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळी पाचही मार्केट आवारांतील अडते-व्यापाऱ्यांमधून निवडणुकीद्वारे प्रत्येकी एक असे पाच प्रतिनिधी संचालक मंडळावर घ्यावेत, ही प्रमुख मागणी होती आणि ती अंमलात आणण्याचे आश्वासनही मिळाले होते. मात्र आता केवळ एकच प्रतिनिधी नियुक्त करणे हा व्यापाऱ्यांवर अन्याय असून, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून पाचही मार्केटमधून निवडणुकीद्वारे प्रत्येकी एक प्रतिनिधी संचालक मंडळावर घ्यावा, अशी नम्र विनंती निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे, असे संजय पानसरे यांनी सांगितले.

